
शिवळे महाविद्यालयात कार्यशाळेला प्रतिसाद
मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : जनसेवा शिक्षण मंडळाचे शांतारामभाऊ घोलप कला व विज्ञान, गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे राज्यशास्त्र विभाग व मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन शैक्षणिक धोरण व आव्हाने’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन बुक्टूच्या डॉ. तृप्ती मुखोपाध्याय यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जनसेवा शिक्षण मंडळाचे सहसचिव प्राचार्य बी. आर. हरड, तर प्रमुख म्हणून जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक मुरलीधर दळवी, उपप्राचार्या डॉ. गीता विशे उपस्थित होत्या.
डॉ. मुखोपाध्याय यांनी नवीन शिक्षण धोरणामुळे कनिष्ठ माध्यमिक विद्यालये बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली. प्रमुख वक्त्या बुक्टूच्या जनरल सेक्रेटरी डॉ. मधू परांजपे यांनी दर्जेदार शिक्षण, उत्तम इमारत, ग्रंथालय व लॅब या सर्व गोष्टींची सोय झाली पाहिजे, असे सांगितले; तर डॉ. माधवी निकम यांनी पुढच्या पिढीचे बालपण धोक्यात आहे, अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली. प्राचार्य बी. आर. हरड यांनी शिक्षण हक्क कायदा लागू झाला, तरी शैक्षणिक धोरणात अनेक त्रुटी असल्याचे मत व्यक्त केले.
-----------------------------------
मुरबाड : शिवळे महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण व आव्हाने यावरील कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित डॉ. तृप्ती मुखोपाध्याय व मान्यवर.