
वीटभट्टीवरील मुले शिक्षणाच्या प्रवाहात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : जिल्ह्यात विविध वीटभट्ट्यांवर अनेक कुटुंबे स्थलांतरित होतात व काही महिने काम करतात. वीट्टभट्ट्यांवरील कामामुळे त्या कुटुंबातील लहान मुलांचे शिक्षण अपूर्ण राहत आहे. ही बाब लक्षात घेता ‘ब्रीक टू इंक’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबाचे समुपदेशन करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात मुलांना आणण्यासाठी ही मोहीम तयार करण्यात आली.
वीटभट्टीवरील मुलांना अंगणवाडी, शाळेत सामावून घेणे, जिथे शक्य असेल तिथे निवासी शाळेमध्ये प्रवेश देणे, कुटुंबाची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांना हेल्थ कार्ड देणे, असे उद्देश या मोहिमेंतर्गत ठरविण्यात आले आहे. वीटभट्टीवर काम करीत असलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेतील गठित केलेली समिती या उद्दिष्टांना समोर ठेवून कार्य करणार आहे. या मुलांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग व डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने ‘ब्रीक टू इंक’ मोहिमेचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
---------------------------
शिक्षणाचा नवा मार्ग
जिल्ह्यातील चार ते पाच वीटभट्ट्यांवर भेट देऊन, पालक भेटी घेण्यात आल्या. मुलांची वाचनक्षमता तपासणी घेण्यात आली. बहुसंख्य मुले ही पूर्ण मुळाक्षर वाचता न येणारी दिसून आली आहेत. ज्या ठिकाणी १० पेक्षा जास्त मुले आहेत. अशा वीटभट्ट्यांवर डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशनमार्फत अभ्यास सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार ६ फेब्रुवारीपासून स्वयंसेवक २ तास अभ्यास वर्ग, २ तास पालक भेटी व मुलांना शाळेत घेऊन जाण्याचे कार्य करीत आहेत. ‘ब्रीक टू इंक’ या मोहिमेंतर्गत गठित समिती वीटभट्ट्यांवरील मुलांसाठी शिक्षणाची वाट दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
...................................
सर्वेक्षण केल्यानंतर जी मुले आढळतील त्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, पोषण आहाराची काळजी घेतली जाणार आहे.
- मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद, ठाणे
............................
समितीचे उद्देश...
- सर्वेक्षण करणे
- पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करणे
- शाळेत मुलांची उपस्थिती वाढविण्याबाबत प्रयत्न करणे. मुलांचे, लेखन, वाचन, आकलन वाढेल, याकडे लक्ष देणे व त्यांची उपस्थिती वाढवून आयसीडीएस विभागाच्या सोई-सुविधा देणे.
- सहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे.
- मुलांना गणवेश, पुस्तक, आरोग्यसेवा, आहार यासाठी प्रयत्न करणे.
- स्वंयसेवी संस्थांची मदत मिळण्याकरिता प्रयत्न करणे.