सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘ऑयलर फेस्टिव्हल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘ऑयलर फेस्टिव्हल’
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘ऑयलर फेस्टिव्हल’

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘ऑयलर फेस्टिव्हल’

sakal_logo
By

पालघर, ता. १५ (बातमीदार) : गणिती जगाच्या इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ज्ञ म्हणून जगविख्यात असलेले स्विस गणितज्ज्ञ ‘लिओनार्ड ऑयलर’ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘ई-डे’ साजरा करण्यात येतो, ज्याला ऑयलर नंबर देखील म्हणतात. याचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील सोनोपंत दांडेकर या महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. आणि गणित विभागाने ‘ऑयलर फेस्टिव्हल’चे आयोजन केले होते.
सोनोपंत दांडेकर या महाविद्यालयात या महोत्सवाच्या माध्यमातून आंतरमहाविद्यालयीन गणिती उत्सव साजरा करण्यात आला. या फेस्टिव्हलचे मुख्य अतिथी प्राध्यापक मंदार भानुशेयांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या परस्परसंवादी प्रेरणादायी सत्रामध्ये गणित विषयाची व्यापकता, गणित विषयातील नवनवीन संधी व गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढविण्यावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले विचार मांडले. उद्‌घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित केले. गणित विभाग प्रमुख प्रा. दीपाली माळी यांनी ‘ऑयलर डे’ आयोजित करण्यामागे मुख्य हेतू विशद केला. महान गणितज्ज्ञ ‘लिओनार्ड ऑयलर’ यांची गणितामध्ये विशेष कामगिरी विद्यार्थ्यांना सांगितली. हा कार्यक्रम आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक आणि उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
.
१५४ विद्यार्थ्यांचा सहभाग
आंतरमहाविद्यालयीन गणिती उत्सवात परस्परसंवादी सत्राबरोबर विविध गणिती स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, सुडोकू, क्रॉसवर्ड, स्नेक अँड लँडर अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. आंतरमहाविद्यालयीन तब्बल १५४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये वडकूण, डहाणू, चिंचणी, ओंढे, नागझरी, बोर्डी, कोलाड, वसई या महाविद्यालयांचा समावेश होता.