धुळीने जव्हारवासी हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळीने जव्हारवासी हैराण
धुळीने जव्हारवासी हैराण

धुळीने जव्हारवासी हैराण

sakal_logo
By

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : शहरात चांगली इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रस्ता खोदून फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम सुरू आहे, पण कामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीने येथील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ही धूळ उडू नये याची प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जव्हारमध्ये निसर्गसौंदर्याने रंगांची उधळण केलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या या शहरात नेहमीच नवनवीन उपाययोजना होत असतात, पण सुयोग्य नियोजन नसल्याने त्याचा त्रास येथील नागरिकांना होत असतो. सध्या शहरातील अनेक भागांतील रस्ते खोदण्यात आले असून यामध्ये येथील शासकीय कार्यालयात चांगल्या प्रकारे इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता फायबर ऑप्टिक पसरवण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. खोदकाम केल्यामुळे अबाल-वृद्ध व लहान बालकांना या ठिकाणाहून ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. शिवाय खोदकाम केल्याने माती उघड्यावर आल्याने हवेने पसरून नागरिकांमध्ये या धुळीमुळे सर्दी-पडशासारखे आजार वाढत आहेत. यावर जव्हार नगर परिषद प्रशासनाने खबरदारी घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शासकीय कार्यालय हे इंटरनेटद्वारे जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे जव्हार शहरातील कार्यालयात इंटरनेट सुविधा पोहोचविण्याकरिता रस्ते खोदण्यात येत असून केबल पसरविल्यानंतर रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम पूर्ववत करण्याच्या सूचना जव्हार नगर परिषदेमार्फत देण्यात आले आहेत. शिवाय केबलचे काम करीत असताना काही परिसर निवडून त्याच भागात खोदकाम करून केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता बुजवून पुन्हा दुसऱ्या परिसरातील काम करावे, अशा सूचनाही नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. असे असताना हे काम नियोजनबद्ध होत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती पसरत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
....
घरातही धुळीचा त्रास
स्वच्छ आणि सुंदर शहरात या आधीच खडखड धरण योजनेतून पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता अद्यापपर्यंत योग्यप्रकारे दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यातच नव्याने आता फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने येथील नागरिकांना या धुळीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या वाहनांसह घरांमध्ये धुळीचा त्रास होत असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
....
जव्हार शहरात शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी रस्त्याच्या कडेला फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. हे काम तीन महिन्यांत पूर्ण करून रस्ता पूर्ववत करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
- प्रवीण जोंधळे, अभियंता, बांधकाम विभाग, जव्हार नगर परिषद