नैनाविरोधात असंतोषाची लाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैनाविरोधात असंतोषाची लाट
नैनाविरोधात असंतोषाची लाट

नैनाविरोधात असंतोषाची लाट

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १५ (वार्ताहर)ः सिडकोच्या बहुचर्चित ‘नैना’विरोधात १२ फेब्रुवारीपासून पनवेल परिसरात गाव बंद साखळी आंदोलन केले जात आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात सुकापूर, आदई, विहीघर, बोनशेत, पळस्पा गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ‘नैना’विरोधात गावपातळीवर ग्रामस्थांमध्ये असंतोषाची लाट पसरल्याचे चित्र आहे.
सिडकोची एजन्सी असणाऱ्या नवी मुंबई एअरपोर्ट नोटिफाईड एरिया अर्थात नैना प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचे हत्यार उपसले आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, पनवेल, उरणमधील २७० पेक्षा अधिक गावे विमानतळबाधित म्हणून अधोरेखित करण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसवण्यासाठी सिडको प्रयत्नात आहे; पण शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रकल्पबांधितांकडून केला जात आहे. तसेच भूमिधारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव असल्याने नैना क्षेत्रातील २३ गावांनी या प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्षाची तयारी केली आहे. याच अनुषंगाने शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात गावबंद साखळी आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनात नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीच्या वतीने अॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके, नामदेव फडके, सुभाष भोपी, अनिल ढवळे यांच्यासह २३ गावांतील शेतकरी, नागरिक सहभागी आहेत.
-------------------------------------
गावांतील अंतर्गत व्यवहार बंद
शेतकरी कामगार पक्ष, नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या नैनाविरोधी हाकेला शेतकऱ्यांसोबत गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नैना हटाव अभी नही तो कभी नही! अशी भूमिका या वेळी संतप्त गावकऱ्यांनी रविवारच्या ग्रामसभेत मांडली. या आंदोलनाचा हा पाचवा दिवस असून पनवेलच्या वेशीवरील पळस्पे गाव बंद करण्यात आले होते; तर ४ मार्चपर्यंत विविध गावांमध्ये अंतर्गत व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
----------------------------------------
शासनाकडून आश्वासनांवर बोळवण
माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत धोरण ठरवू, विमानतळ प्राधिकरण, सिडको मंडळ, नैना प्राधिकरणाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दीड महिना उलटला, तरी कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे २३ गावांमधील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------------------------------
गाव बैठकांमधून प्रबोधन
‘रस्त्यावर उतरलो, तरच न्याय मिळेल आणि एकत्र येऊन लढू या आणि आत्मदहन करण्याची वेळ आली तरी करू,’ अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तसेच नैना शेतकऱ्यांसाठी कशी घातक आहे, याबाबतदेखील गाव बैठकांमधून प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-------------------------------------------
‘नैना’चा मुद्दा विधिमंडळात सहा वेळा उपस्थित केला; मात्र केवळ आश्वासने मिळाली. बैठक लावू, चर्चा करू, असे सांगण्यात आले; मात्र कोणतीच बैठक झाली नसल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ‘नैना’विरोधात एकजुटीनेच लढले पाहिजे, पुढच्या पिढीचं भले करायचे असेल, तर सुरू असलेले आंदोलन सोडू नका.
- बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप
------------------------------------
आमच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या जमिनी आम्ही कष्ट करून सांभाळल्या आहेत. त्या जमिनी आम्ही तुम्हाला मोफत का द्यायच्या. आम्हाला कोणत्याही स्वरूपात नैना प्राधिकरण नको, हीच भूमिका आमची कायम राहणार आहे. आज जरी आमचे आंदोलन शांततेत होत असले, तरी पुढील काळामध्ये आंदोलनाचे स्वरूप बदलायला मागेपुढे पाहणार नाही.
- राजेश केणी, सचिव, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती
------------------------------------
नैना प्रकल्प हा अतिशय घातक आहे. या प्रकल्पामध्ये भूसंपादन झाल्यास संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होईल. कायद्याचा आधार घेऊन जमिनी संपादित केल्या जातात. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट या ठिकाणी येत असून भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी जागा उरणार नाही.
- अनिल ढवळे, माजी सरपंच शिवकर
-----------------------------------------
गावबंद आंदोलनाची ठिकाणे
१२ फेब्रुवारी - सुकापूर
१३ फेब्रुवारी - आदई
१४ फेब्रुवारी - विहीघर
१५ फेब्रुवारी - विचुंबे
१६ फेब्रुवारी - पळस्पे
१७ फेब्रुवारी - चिपळे
१८ फेब्रुवारी आंदोलन विश्रांती
१९ फेब्रुवारी आंदोलन स्थगित
२० फेब्रुवारी - बोनशेत-भोकरपाडा
२१ फेब्रुवारी - नेरे
२२ फेब्रुवारी- देवद
२३ फेब्रुवारी- हरिग्राम केवाळे
२४ फेब्रुवारी- खानाव
२५ फेब्रुवारी- रिटघर
२६ फेब्रुवारी- शिरढोण
२७ फेब्रुवारी- कोन
२८ फेब्रुवारी- बोर्ले
१ मार्च - चिखले
२ मार्च - कोळखे, पेठ, पारपुंड
३ मार्च- ऊसर्ली, डेरवली
४ मार्च- शिवकर