
एपीएमसीत हापूस आंब्याची विक्रमी आवक
वाशी, ता. १५ (बातमीदार) : वाशीतील एपीएमसी बाजारात सोमवारपासून हापूसची आवक वाढली आहे. बुधवारी एपीएमसी बाजारात ८५० पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदाच्या पूर्व हंगामातील विक्रमी आवक झाल्याचे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. सोमवारी एपीएमसी बाजारात ३२५, तर मंगळवारी ४७९ पेट्या दाखल झाल्या होत्या. हापूसच्या प्रतवारी दर्जानुसार साडेतीन ते आठ हजार रुपये पेटीचा दर आहे. जानेवारीत तुरळक प्रमाणात हापूस आवक होती; परंतु आता फेब्रुवारीपासून हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात ५० ते ६० पेट्या दाखल झाल्या होत्या. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी ८५० पेट्यांची विक्रमी आवक झाली आहे.
गेल्या वर्षी या हंगामामध्ये २० ते २५ पेट्या बाजारात दाखल होत होत्या. त्यामुळे पेटीचे दर देखील दुपटीने होते. गत वर्षी ८ हजार ते १५ हजार रुपये पेटीचा दर होता. मात्र या वर्षी हापूस आंब्याची आवक जास्त असल्यामुळे दरात घसरण झाली असून दर निम्म्याने कमी असून साडेतीन हजार ते ८ हजार रुपये आहे. आवक वाढल्यानंतर दरामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत कोकणातून हापूस आंबा जास्त येत असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरीमधून हापूस आंब्याची आवक होत आहे.
कोट
------
बुधवारी हापूस आंब्याची सर्वात जास्त आवक झाली असून ८५० पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी हापूस आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. सद्यस्थितीत हापूस आंब्याच्या पेटीचा दर साडेतीन हजार ते आठ हजार रुपये आहे.
- संजय पानसरे, व्यापारी