
पालघर जिल्ह्यात दहावीचे ६०१३६ विद्यार्थी
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदा पालघर जिल्ह्यातील ६०१३६ दहावी, तर ४९११६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात व शहरासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा शिक्षण विभागातून देण्यात आली आहे. शिवाय या समितीच्या माध्यमातून परीक्षेच्या संपूर्ण हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. २१ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या परीक्षेचा शेवट २१ मार्चला होणार आहे; तर २ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून २५ मार्च रोजी अखेरचा पेपर असणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ती ६०१३६ एवढी आहे. जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.