घोडबंदर किल्ल्यावर फडकणार शंभर फुटी भगवा

घोडबंदर किल्ल्यावर फडकणार शंभर फुटी भगवा

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : घोडबंदर येथील ऐतिहासिक किल्ल्यात असलेल्या बुरुजावर १०५ फूट उंच हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकणार आहे. बुरुजावरील ध्वजस्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले असून १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा भव्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एखाद्या गड-किल्ल्यावर असा उंच भगवा ध्वज असलेला घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला ठरणार आहे.
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाचे, तसेच सुशोभीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून आमदार प्रताप सरनाईक यांनी किल्ल्याच्या बुरुजावर १०५ फूट उंचीचा भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कामासाठी आमदार सरनाईक यांनी ५० लाखांचा आमदार निधी दिला आहे.
किल्ल्यावर साधारण १०५ फूट उंच ध्वजस्तंभ आहे; तर भगवा ध्वज २० फूट उंच व ३० फूट लांब असा असणार आहे. हा ध्वज चोवीस तास फडकत राहणार आहे. विशेष म्हणजे हा ध्वज रात्रीही दिसावा यासाठी आकर्षक अशी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ध्वज पूजन यात्रा’ काढून ध्वजाची प्रतिष्ठापना केली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. त्याआधी घोडबंदर गावातील श्री दत्त मंदिरात अकरा ब्राह्मणांकडून विधिवत या ध्वजाचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात ‘ध्वज पूजन यात्रा’ निघणार आहे. ध्वजाचे पूजन करून पालखीतून भगवा ध्वज किल्ल्यात नेला जाईल व ध्वजस्तंभावर त्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यावेळी महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, घोडबंदर ग्रामस्थ, तसेच शिवप्रेमी उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
....
लवकरच लाईट साऊंड शो
घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या पुढच्या टप्प्यात या किल्ल्याच्या बुरुजावर प्रोजेक्शन मॅपिंग लाईट साऊंड शो दाखविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यात घोडबंदर किल्ल्याची, इतिहासाची माहिती देणारी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत या बुरुजावर लाईट साऊड शोमधून दाखवली जाणार आहे. तसेच किल्ल्यातील हौदात म्युझिकल फाऊंटन आणि किल्ल्यात आकर्षक विद्युत रोषणाई, ही कामेही पुढच्या टप्प्यात होणार आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com