
विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूलचे यश
विरार, ता. १५ (बातमीदार) : वसई कोल्ट्स आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त १४ व १६ वर्षे वयोगटाखालील मुलांच्या वसई तालुका आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. माजी रणजीपटू कै. मनोहर अनंत राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९ वर्षे वयोगटातील मुलाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाही या वेळी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर पार पडला. या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूल; तर १६ वर्षांखालील गटात एन. जी. वर्तक स्कूल विजयी ठरले. कै. मनोहर राऊत स्मृतीप्रित्यर्थ १९ वर्षांखालील गटात उत्कर्ष ज्युनिअर कॉलेज विजयी ठरले. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दीपक पाटील, अभय हडप, महेश साटम, कौशिक गोडबोले, प्रमोद यादव संदीप विचारे, क्रिकेटपटू अनिल गुरव, माजी रणजीपटू राजेश सुतार, माजी महापौर प्रवीण शेट्टी, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, शरद विचारे व आश्रयदाते सतीश बुद्धदेव व इतर मान्यवर उपस्थित होते.