
महाविद्यालयीन शिक्षकांची वाशीत निदर्शने
तुर्भे, ता.१५ (बातमीदार)ः मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून बुधवारी (ता.१५) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी वाशी येथील विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयावर धडक देत प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलन केले.
शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा शालार्थ क्रमांक लवकर दिला जात नाही. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळालेली असताना देखील वर्षभर शिक्षकांचे पगार सुरू होत नाहीत. कित्येकदा अनुचित कारणे सांगून शालार्थ प्रस्ताव परत केले जातात. शालार्थ क्रमांक मिळाल्यावर लॉगिन देण्यासाठी सुद्धा मंडळ विलंब लावते. त्यामुळे पगारास आणखी उशीर होतो. त्याचप्रमाणे परीक्षेच्या कामाचे मानधन देण्यास उशीर लावणे, त्यामध्ये अकारण काटछाट करणे इत्यादी बाबींबद्दल शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच शिक्षकांना वारंवार हेलपाटे घालायला लावण्यात येत असून गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे मानधन विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबर दिले नसल्याने मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वाशीत आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी विभागीय अध्यक्षांच्या कारभाराची चौकशी करावी तसेच त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
------------------------------
अडीचशेहून अधिक शिक्षकांचा सहभाग
या आंदोलनात अडीचशेहून अधिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीतर विभागीय मंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.