महाशिवरात्रीसाठी अंबरनाथला प्रशासन यंत्रणा  सज्ज

महाशिवरात्रीसाठी अंबरनाथला प्रशासन यंत्रणा सज्ज

अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथला विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. त्यानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते. कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षे अंबरनाथला भरणारी यात्रा होऊ शकली नव्हती. यंदा पुन्हा शहरातील प्राचीन शिवमंदिर भाविकांच्या उपस्थितीने गजबजून जाणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्‍या या उत्‍सवासाठी नगरपालिका आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेत.
पालिका प्रशासनाने मंदिराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी विशेष स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान अंबरनाथच्या स्वामी समर्थ चौक, नवा बायपास, उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपासून शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर फक्त नागरिकांना पायी प्रवेश देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना शिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून शिवमंदिराकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या दिशेने भाविकांना रांगेत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या मंडपाची सोय केली आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविकांना मंदिराजवळील वालधुनी नदीवरील लहान पुलांवरून बाहेर जावे लागणार आहे.
वालधुनी नदीपात्र स्वच्छ
यात्रेच्या निमित्ताने विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल यांची लगबग पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मागील आठवड्यात मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. वालधुनी नदीपात्रदेखील स्वच्छ करण्यात आले आहे.

यंदा यात्रेमध्ये भोंगे आणि पिपाण्या वाजणवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिस प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यातून ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिस निरक्षक भगत यांनी दिले.
मंदिराच्या आतील भागासह इतर ठिकाणी बसवलेले सीसी कॅमेरे नादुरुस्त झाल्याने पुरातत्‍व खात्याच्या माध्यमातून मंदिर आणि परिसरात सुमारे १२ सीसी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
याशिवाय पोलिस आणि पालिकेच्या माध्यमातून काही ठराविक ठिकाणी साईड स्क्रीन बसवले जाणार आहेत. याद्वारे थेट महादेवाचे दर्शन मंदिरातून घेता येणे शक्य होणार आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
अंबरनाथचे शिवमंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी १०६० च्या दशकात हे मंदिर बांधले असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले हे मंदिर केवळ अंबरनाथ शहराचे नव्हे तर देशाचे वैभव आहे. श्रद्धा असलेल्या भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे.
महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेनिमित्त आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ३०० पोलिस कर्मचारी तसेच १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी पाचारण करण्याबाबत निर्णय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com