‘खोलसापाडा’साठी महापालिकेची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘खोलसापाडा’साठी महापालिकेची लगबग
‘खोलसापाडा’साठी महापालिकेची लगबग

‘खोलसापाडा’साठी महापालिकेची लगबग

sakal_logo
By

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १५ : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात सध्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे मुबलक पाणी नागरिकांना मिळावे म्हणून आढावा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचा घेतला जात आहे. तर दुसरीकडे भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून खोलसापाडा धरणात येत्या पावसाळ्यात पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी कृतिशील पावले उचलली जात आहेत.
वसई विरार शहर महापालिकेला पेल्हार, उसगाव व सूर्या धामणी पाणीपुरवठा योजनेतून एकूण २३० एमएलडी पाणी साठा उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात पुढील २० वर्षात वसई विरार शहराची लोकसंख्या ४५ लाख इतकी होणार असल्याची शक्यता आहे. त्यामानाने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत विरार, नालासोपारा, वसईत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विरार पूर्व भागात जाणवणाऱ्या पाणी टंचाईबाबत बहुजन विकास आघाडीने पालिका आयुक्तांची भेट घेत पाण्याची समस्या मांडली, इतकेच नव्हे तर नागरिक देखील प्रशासनाची भेट घेत आहेत. त्यामुळे पाणी विभागाने पाण्याचे वितरण प्रत्येक प्रभागात कसे करता येईल याचे नियोजन करण्यावर भर दिला आहे.
सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. भविष्यात पाणी मुबलक मिळावे म्हणून खोलसापाडा धरणाच्या कामाकडे पालिकेने लक्ष वळविले आहे. खोलसापाडा १ या धरणातून १४ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी एकूण ७० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. जून महिन्यात पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तर खोलसापाडा २ धरणातून ६० एमएलडी पाणी मिळणार आहे. याठिकाणी वनविभागाचा अडथळा होता, मात्र वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वनखात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अडसर दूर झाला. या धरणाचे काम देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
एकीकडे वाढती लोकसंख्या पाहता पाण्याची तूट निर्माण होत आहे दरवर्षी पाणीबाणी वसई विरार शहरात निर्माण होत असते नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महागड्या पाण्याच्या बाटल्या, टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने भविष्यातील योजना लवकर कार्यान्वित व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
-------------------
सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर खोलसापाडा धरणाची पाहणी केली आहे. यासाठी योग्य नियोजन करून निविदा, कामाच्या सूचना यासह जुलै महिन्यात धरणात पाण्याची साठवणूक याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. जेणेकरून हे काम पूर्ण झाल्यावर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अतिरिक्त पाणी मिळेल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
---------------------
आयुक्तांकडून पाहणी
वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी खोलसापाडा धरणाची बुधवारी पाहणी केली. याठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच पाण्याचे नियोजन करण्यासाठी उपायोजना याचा आढावा घेतला आहे.