
बोगस कंपनीद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड
नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : वेगवेगळ्या बोगस कंपन्या स्थापन करून, स्वस्त दरात फ्लॅट उपलब्ध असल्याची जाहिरात देत सर्वसामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात विरार गुन्हे शाखा कक्ष ०३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी वसई-विरार नालासोपारा, ठाणे, मुंबई परिसरातील १५७ नागरिकांची ३ कोटी ७५ लाखांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या आरोपींविरोधात अर्नाळा सागरी पोलिस, ठाणे, विरार, बृहन्मुंबई आझाद मैदान आणि ठाणे शहरातील चितळसर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
परवेझ दस्तगीर शेख ऊर्फ राहुल भट ऊर्फ पीटर सिक्वेरा, ऊर्फ असिफ सय्यद (वय ३१), साहेब हुसेन शेख ऊर्फ नितीन शर्मा ऊर्फ प्रशांत बन्सल ऊर्फ सोहेल शेख (वय २८), प्रवीण मल्हारी ननावरे, हिना इकबाल चुडेसरा ऊर्फ हिना सय्यद अशी अटक आरोपींची नावे आहेत. विरार पश्चिम बोलींज या पत्त्यावरील बिल्डर्स विनर्स या कंपनीच्या नावाने जून २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत बँकेने लिलावात काढलेली मालमत्ता स्वस्तात तडजोडीअंती विकण्याचे प्रलोभन दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करून ४४ नागरिकांची ८० लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी ५६ वर्षांचे पियुशकुमार दिवाण यांच्या तक्रारीवरून २८ मार्च २०२२ ला अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय, ठाणे, मुंबई परिसरात ही गुन्हे दाखल झाले होते.