माहिती अधिकार फलक गायब

माहिती अधिकार फलक गायब

जव्हार, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या जव्हार तालुक्यात आजही शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, आरोग्य व्यवस्थेच्या अपुऱ्या यंत्रसामुग्री, खरीप हंगामातील शेती, रोजगारांच्या अल्प संधी अशा परिस्थितीत येथील नागरिकांना आपले जीवन जगावे लागते. असे असताना तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे जव्हार तहसील कार्यालयातून नागरिकांच्या हिताचा माहिती अधिकार फलक चक्क गायब असल्याचे समोर आले आहे.
जव्हार शहरातील अगर ग्रामीण भागातील नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून ते रेशन कार्ड, शालोपयोगी विविध दाखले, नागरिकत्वाची ओळख असणारे मतदान कार्ड तसेच इतर योजनांसंदर्भात तहसील कार्यालयात यावे लागते. मात्र या ठिकाणी तहसील कार्यालय परिसरात किंवा अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर कुठेही माहितीच्या अधिकारात कोणाकडे कसा अर्ज करावा, याचा फलकच लावण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. स्वस्त धान्य दुकान पुरवठा विभाग हा तहसील कार्यालयातच असल्याने येथेही नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. रेशन कार्ड दुरुस्ती, रेशनमध्ये नावे कमी करणे, ऑनलाईन नोंदी करणे यासाठी नागरिकांची गर्दी रोजच असते.

------------------
अर्ज करण्यासंदर्भात संभ्रम
ज्या कार्यालयात नेहमी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते, त्याच कार्यालयात सर्वसामान्यांसाठी सरकारने दिलेल्या माहितीच्या अधिकाराबाबतचा फलकच गायब झाला आहे. माहितीच्या अधिकारात कोणाकडे कशी माहिती मागवावी यासंदर्भातला बोर्ड तहसील कार्यालयात आजपर्यंत लावण्यात आलेला नाही. माहितीच्या अधिकारात कोणाकडे कसा अर्ज करावा, याचा फलकच लावण्यात आलेला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याकडे कोणीच अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनजागृती कशी होईल, हा प्रश्न उद्भवला आहे.

---------------------
माहिती अधिकार नवीन फलक बनवण्यासाठी देण्यात आला आहे. लवकरात लवकर फलक लावण्यासाठी सूचना केली आहे.
- आशा तामखडे, तहसीलदार, जव्हार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com