
शिक्षणाबरोबरच साईकल चालवण्याचे धडे
कासा, ता. १६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील रायतली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे तेथील गरीब मुला-मुलींना शिक्षणाची गोडी निर्माण होत आहे. अलर्ट सिटिजन फोरम मुंबई या सामाजिक संस्थेने शाळेसाठी तीन सायकली दिल्या आहेत.
रायतली येथील शाळेत १३० विद्यार्थी असून यामधून ३० विद्यार्थी सायकल चालवण्यास शिकले आहेत. अलर्ट सिटीजन फोरम मुंबई सामाजिक संस्थेच्या मार्फत शाळेला तीन सायकली दिल्या असून त्या सायकलीद्वारे खेळाच्या तासात विद्यार्थी हे सायकल चालवण्याचे प्रशिक्षण घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच उत्साह व खेळाडू वृत्ती निर्माण होताना दिसत आहे. तसेच या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असून त्यांना सायकल विकत घेऊन सायकल चालवण्याचा आनंद घेता येत नाही; परंतु या संस्थेमार्फत या सर्व उणीवा भरून निघाल्या आहेत. या मुळे दररोज सायकली चालवण्यास मिळाल्याने विद्यार्थीदेखील आवडीने शाळेत येत असल्याचे शिक्षक हनुमंत तोडकर यांनी सांगितले.