धारावीत चर्मकार समाजाचा भव्य समाज मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत चर्मकार समाजाचा भव्य समाज मेळावा
धारावीत चर्मकार समाजाचा भव्य समाज मेळावा

धारावीत चर्मकार समाजाचा भव्य समाज मेळावा

sakal_logo
By

धारावीत चर्मकार समाजाचा भव्य समाज मेळावा
ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव
धारावी, ता. १६ (बातमीदार) : गुरू रोहिदास यांची ६२५ वी जयंती आणि वीर कक्कया महाराज जयंती असा संयुक्त महोत्सव, भव्य समाज मेळावा आणि समाजातील ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा बुधवारी (ता. १५) धारावीतील पी. एम. जी. पी. वसाहतीतील मनोहर जोशी महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. चर्मकार समाजाची अखंडता, अस्मिता, अस्तित्व आणि उज्ज्वल भवितव्यासाठी चर्मकार समाजाचा बुलंद आवाज अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय चर्मकार संघ कार्य करीत असून त्या अनुषंगाने संघाच्या मुंबई विभागातर्फे पार पडलेल्या सोहल्यास समाजबांधव आणि भगिनी मोठ्‍या संख्येने उपस्थित होत्या.
२५ वर्षांपासून संघटना चर्मकार समाजाचे नेते, संस्थापक-अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चर्मकार समाजातील समाजबांधवांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात काम करीत आहे. समाजबांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवन खर्ची घातले असे ज्येष्ठ नेते तुकाराम भोसले, अशोक (दादासाहेब) शिंदे, विलास देवळेकर, कविवर्य व ज्येष्ठ नेते शंकर खिल्लारे, गोविंद खटावकर, लेखक रवींद्र बागडे, वसंत काळे, डॉ. विठ्ठलराव दांगडे, दिवंगत प्रकाश समशेर (मरणोत्तर), दिवंगत मारुतीराव कारंडे (मरणोत्तर), दिवंगत देविदास खेडेकर (मरणोत्तर) आदी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सोहळ्यात सपत्निक समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात आल्या.
कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कक्कया समाजाचे एक नेते परशुराम इंगोले आदी मान्यवरही आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. कार्यक्रमात समाजभूषण शिवशाहीर सुरेशराव सूर्यवंशी (आसंगीकर) पुणे आणि सहकारी यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला.

एकत्रित संघर्ष करून विकास साधा!
चर्मकार समाजातील उपेक्षितांनी एकत्र येऊन अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. एकत्रित संघर्ष करून आपल्या समाजबांधवांचा विकास साधायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार समाजाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव माने यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देशही त्यांनी सांगितला.