
सिसिडिटी संस्थेकडून मालाड आप्पापाडा जामृशीनगरमधील जळीतग्रस्तांना मदतीचा हात
मालाडमधील जळीतग्रस्तांना
सीसीडीटी संस्थेचा मदतीचा हात
मुंबई, ता. १६ (बातमीदार) ः मालाडमधील आप्पा पाडा जाम ऋषीनगरमध्ये लागलेल्या आगीत संसार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना समाजसेविका सारा डिमेलो यांनी स्थापन केलेल्या सीसीडीटी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेतील चाईल्ड लाईन टीमने दोन दिवस संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सुकन्या पोद्दार यांच्या मार्गदर्शनानुसार वस्तीतील बांधवांना सी. के. रामणी यांनी दिलेल्या मदतीतून जीवनोपयोगी वस्तूंच्या ६७ किट्सचे वाटप केले. बेडशीट, चादर, टॉवेल, जीवनावश्यक किराणा साहित्य, बिस्कीट इत्यादी साहित्यांचा त्यात समावेश आहे.
मदतीच्या एक दिवस आधी सीसीडीटी टीमने वस्तीत जाऊन सर्वेक्षण केले. आगीत नुकसान झालेल्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे मदतीचे नियोजन केले. मालाड-आप्पापाडा परिसरातील आगीत जवळपास १५ घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे ५०-६० घरांची मनुष्यवस्ती बेचिराख झाली होती. तेथील नागरिकांन अजूनही जीवनावश्यक वस्तूंसह कपडे व मुलांच्या शालेय साहित्याची नितांत आवश्यकता असून मुंबईतील नागरिक आणि संस्थांनी सहाय्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सीसीडीटी संस्थेने केले आहे.