आर्थिक सुधारणा समितीकडून करवाढीची शिफारस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक सुधारणा समितीकडून करवाढीची शिफारस
आर्थिक सुधारणा समितीकडून करवाढीची शिफारस

आर्थिक सुधारणा समितीकडून करवाढीची शिफारस

sakal_logo
By

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्थापन केलेल्या आर्थिक सुधारणा समितीने आगामी वर्षात मालमत्ता करासह अन्य सर्व करांत वाढ करण्याची शिफारस आयुक्तांकडे केली आहे. आता या शिफारशींवर आयुक्त अंतिम निर्णय काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता उत्पन्नात वाढ करण्यावाचून प्रशासनापुढे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यातच पंधराव्या वित्त आयोगाकडून अनुदान हवे असेल, तर उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ करा, असा दंडकच शासनाने घालून दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच खर्चात बचत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा अभ्यास करण्यासाठी आयुक्तांनी आर्थिक सुधारणा समितीची स्थापना केली होती. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपायुक्त, शहर अभियंता, नगररचना विभागाचे सहायक संचालक, लेखा परीक्षक, मुख्य लेखाधिकारी आदींचा त्यात समावेश होता.
समितीने आपला अहवाल नुकताच आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यात विविध विभागांकडून आकारल्या जाणाऱ्‍या करात वाढ करण्याची शिफारस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने मालमत्ता करात सुमारे पंचवीस ते तीस टक्के वाढ करण्याची शिफारस आहे. तसेच पाणी कर, परवाना शुल्क यासह महापालिकेच्या विविध विभागाकडून आकारण्यात येणाऱ्‍या करात व शुल्कात थोडी थोडी वाढ करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली आहे. मालमत्ता करात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली असली, तरी ही वाढ लागू झाली, तर ती केवळ नव्याने करआकारणी होणाऱ्‍या मालमत्तांसाठीच आहे. जुन्या मालमत्ताधारकांच्या करात कोणतीही वाढ केली जाणार नसून त्यांना जुन्या दरानेच देयके पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता समितीने केलेल्या शिफारसी स्वीकारायच्या की नाही, स्वीकारल्या, तर करात नेमकी किती वाढ करायची, याचा निर्णय प्रशासक म्हणून आयुक्त दिलीप ढोले यांच्यावर अवलंबून असणार आहे. येत्या काही दिवसांतच महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सादर करणार आहेत. त्या वेळीच प्रत्यक्ष करवाढ करण्यात आली की नाही, हे स्पष्ट होणार आहे.