
पालघरमध्ये संतसेवालाल महाराज जयंती साजरी
पालघर, ता. १६ (बातमीदार) : बंजारा समाज गुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती पालघर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा मुख्यालय आणि तालुका स्तरावर सर्व पंचायत समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाचे आदर्श गुरु संत सेवालाल महाराज यांनी धार्मिक विचारांबरोबर सामाजिक आणि क्रांतिकारी विचारंचा प्रचार आणि प्रसार केला. या कार्यक्रमावेळी पालघर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, प्रशासकीय अधिकारी अजय ठाकरे तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालघरमध्येही बाबासाहेब आंबेडकर चौकात बंजारा समाजातर्फे संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.