
महावितरणाला लाखोंचा शॉक
घणसोली, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभागात महावितरणच्या माध्यमातून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला स्पीकरच्या माध्यमातून बिल भरण्यासाठी आवाहन केले जाते. मात्र, तरीही दर महिन्याला १७०० ते १८०० ग्राहकांचे वीजबिल भरणा प्रलंबित असतो. ग्राहकांनी वीजबिल भरणा न केल्याने महावितरणचे ४० ते ६० लाखांची थकबाकी येणे आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांचे बिल प्रलंबित आहेत, त्यांनी वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
घणसोली विभाग हा दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. या ठिकाणी लोकवस्तीही मोठी आहे. घणसोलीत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असून, विभागातील काही नागरिकांमुळे महावितरण चिंतेत आहे. घणसोली विभागात लाखोंच्या घरात वीजबिलाच्या रकमेची थकबाकी असल्याने महावितरण विभाग अनेक माध्यमांतून ग्राहकांना बिल भरण्याचे आवाहन करत आहे. दर महिन्याला १७०० ते १८०० ग्राहकांनी वीजबिल भरणा केलेलाच नसतो. प्रलंबित वीजबिल भरणामुळे घणसोली महावितरणमध्ये दर महिन्याकाठी ४५ ते ६० लाखांची थकबाकी आहे. या संदर्भात महावितरणच्या अधिकार्यांना थकबाकीचे कारण विचारले असता, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण वीजबिल भरणे टाळत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पीकरद्वारे आवाहन
महावितरणच्या माध्यमातून वीजबिलाची अंतिम तारीख उलटून गेल्यावर भरणा करण्यासाठी आवाहन केले जाते. महिन्यातून १५-१६-१७ या तारखांना महावितरणच्या वतीने स्पीकरच्या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले जाते; अन्यथा वीज कापली जाईल, असे देखील बजावले जाते.
काही महिन्यांपासून घणसोली विभागात १७०० हून अधिक ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे. त्यांना वारंवार अनेक माध्यमांतून आवाहन केले; तसेच वीजबिल न भरल्यास ती कापली जाईल, अशी सूचनाही दिली जाते. नागरिकांनी वेळेत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
- धीरज बिराजदार, सहायक अभियंता, महावितरण