
माइंडस्पेस गार्डनमध्ये पक्षी निरीक्षणाची संधी
मालाड, ता. १९ (बातमीदार) ः मालाड माइंडस्पेस गार्डनमध्ये अनेक वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. बरेच पर्यावरणप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांनी या भागात दुर्मिळ प्रजाती, विशेषत: बागेच्या अगदी जवळ असलेल्या दक्षिण पश्चिम किनाऱ्याच्या खाडीजवळ फ्लेमिंगोची नोंद केली आहे. पक्षीनिरीक्षण आणि संशोधन करणाऱ्यांना पर्यावरणप्रेमींना तसेच सामान्य मुंबईकर जनतेला, निसर्गाला धक्का न लावता स्थलांतरित पक्षीनिरीक्षण करता यावे, यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान तथा माइंडस्पेस गार्डन येथे दोन टॉवर उभारण्याचा महापालिकेचा प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने सशर्त मंजुरी दिल्या नंतर नुकतेच आमदार विद्या ठाकूर, आमदार अस्लम शेख, माजी नगरसेवक दीपक ठाकूर आणि सहायक आयुक्त पी दक्षिण राजेश आक्रे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन एएलएम माइंडस्पेस मालाड यांनी केले होते. या वेळी महापालिका कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि कंत्राटदार जुगलकिशोर माली उपस्थित होते.
पक्षीनिरीक्षण करता यावे, यासाठी प्रस्तावित बांधकाम कोस्टल रेग्युलेशन झोन अधिसूचनेतील तरतुदींनुसार करण्यात येणार असल्याची माहिती सहायक अभियंता निशा दळवी यांनी दिली. तसेच पालिकेद्वारे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि स्वच्छतागृहांच्या विद्यमान सुविधा वाढवल्या जाणार आहेत. तसेच पक्ष्यांना एलईडी लाईट्सचा त्रास होऊ नये याचीदेखील काळजी घेऊन शाश्वत ऊर्जेचा वापर म्हणून टॉवर्सच्यावर सौर पॅनेलदेखील लावण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.
टॉवरमुळे पक्षीनिरीक्षण वाढेल आणि स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण होईल. सोबतच दुर्मिळ पक्ष्यांबाबत लोकांमधील रुची वाढेल आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होईल.
– राजेश आक्रे, सहायक आयुक्त