
घरफोडीतील सराईत चोरट्याला अटक
मुंबई, ता. १६ : मुंबई शहराच्या विविध पोलिस ठाण्यात दाखल १२ गुन्ह्यात, तसेच न्यायालयांनी सुनावलेल्या सहा अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली आहे. मोहम्मद वसीम ऊर्फ दाढी समसुल हक चौधरी (वय ४६) याला नवी मुंबईच्या कळंबोली सेक्टर १४ मधून ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने सहा अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते. आरोपीच्या पत्त्यावर जाऊन त्याचा वारंवार शोध घेतला असता तो मिळाला नव्हता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीय सूत्रांकडून आरोपी कळंबोली येथील पत्त्यावर आल्याची माहिती मिळाली. आज (ता. १६) पहाटे तीन वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबोली येथे आरोपीच्या पत्त्यावर कारवाई केली. त्याला ताब्यात घेऊन त्याला मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावली.