
विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट रोखल्याने मनविसेचे ठिय्या आंदोलन
वज्रेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील नोबेल इंग्लिश हायस्कूलमधील दहा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट फी न दिल्याने विदयालय प्रशासनने रोखल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शाळेतच ठिय्या आंदोलन सुरु केले.
तालुक्यातील काल्हेर येथील नोबेल इंग्लिश विदयालयातील इयत्ता बारावीच्या दहा विदयार्थींनी फी न भरल्यामुळे त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट रोखल्याचे मनविसे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांना कळताच त्यांनी पदाधिकाऱ्यांसह शाळेत भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी दहितुले ह्यांनी फोनवर संबंधित शाळा व्यवस्थपणाची मनमानी सांगितली. त्यानंतर विद्यार्थींना हॉल तिकीट देण्याबाबत स्पष्ट आदेश देऊन ही शाळा प्रशासन हॉल तिकीट न देण्यावर ठाम असल्याने मनविसेचे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी ह्यांनी पदाधिकाऱ्यांसह शाळेत ठिय्या आंदोलन सुरू केले. ह्या आंदोलनात पालक व विद्यार्थी सोबत मनविसेचे जिल्हा सचिव हर्षल भोईर, ॲड. सुनील देवरे, तालुका सचिव सूरज पाटील, मिलिंद तरे, मयूर तारमले उपस्थित होते.