सहाय्यक आयुक्त हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सहाय्यक आयुक्त हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा ४ जणांना अटकही करण्यात आली. आरोपींना गुरुवारी न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांचा समावेश असून त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हल्ल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या आहेर यांनी नौापाडा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली होती. दरम्यान, घटनास्थळी सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गणेश गावडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ आदींनी भेट देत पाहणी केली.

पालिका कर्मचाऱ्यांकडून हल्ल्याचा निषेध
सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद गुरुवारी ठाणे पालिका मुख्यालयात उमटले. मुख्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांनी काळ्या फिती लावून या हल्ल्याचा निषेध केला. थेट मुख्यालयात मारहाण करण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

राजकीय आरोपांच्या फैरी
महेश आहेर हल्लाप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात दिवसभर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. या प्रकणाची चौकशी करावी, अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे यांनी केली; तर अद्यापही आहेर यांची ऑडिओ क्लिप देऊनही त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला. भाजपनेही या प्रकरणात उडी घेत विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवणार असल्याचे सांगितले. दरम्यान अनधिकृत बांधकाम प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत दोषी आधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

राजकारण बाजूला ठेवा : जितेंद्र आव्हाड
ज्या मुलीच्या जन्मानंतर साधे बोटही कधी लावले नाही किंवा ओरडलो नाही, तिच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डिंग लावून बसतो. मारून टाकेन म्हणतो. तेव्हा राग येतो, अस्वस्थता येते असे भावनिक पत्र आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे. राजकारण बाजूला ठेवा; पण कधीतरी या गोष्टीचादेखील विचार करा, असे आव्हाड यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच हा बाबाजी कोण, तर दाऊद इब्राहीमचा हस्तक असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी पत्रात केला आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही संताप व्यक्त करत महेश आहेर हे यापूर्वीदेखील धमक्या देत असल्याचे सांगितले. आता बस करा, खूप झाले, असे हात जोडत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच विनंती केल्यामुळे पुन्हा तर्कवितर्क केले जात आहेत.

...................................
कथित ऑडिओ क्लिप खोटी ः महेश आहेर
जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ती खोटी असून त्यामध्ये माझा आवाज नाही, असा ठाम दावा सहायक आयुक्त महेश आहेर यांनी केला आहे. आपल्या नोकरीवर गदा आणण्यासाठी आणि आपल्याला सार्वजनिक आयुष्यातून उठवण्यासाठी हेतुपरस्सर अशा बनावट क्लिप बनवल्या जात आहेत. २०१९ पासून मी मुंब्य्राचा सहायक आयुक्त होतो, तेव्हा मी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत होतो. तेव्हापासून मला मारण्याचा कट केला जात होता. मला काही लोकांकडून धमक्या येत होत्या. राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. आताही तसाच कट रचण्यात आला असल्याचे आहेर यांनी सांगितले. माझेही कुटुंब आहे, त्यामुळे मी असे करणे शक्य नाही, असेही ते म्हणाले. गेली चार वर्षे माझे कुटुंबही प्रचंड तणावात आहे. रात्री-अपरात्री मला ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या; पण तरीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवत अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्याचाच राग अजूनही काढण्यात येत असून कृपया अशा प्रकारच्या बनावट क्लिपवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सहायक आयुक्त महेश आहेर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री भेटीची अफवा
महेश आहेर प्रकरणाशी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडले जात आहे. जखमी आहेर यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात गेले होते, अशी दिवसभर समाजमाध्यमांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र हे वृत्त खोटे असून मुख्यमंत्री शिंदे ज्युपिटरमध्ये उपचार घेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटायला गेले होते, असा दावा प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातूनही खुलासा आला असून त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अशी कोणतीही भेट घेतली नसल्याचे नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com