
हर्णे गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विद्यार्थी व पालकांच्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी ‘सकाळ स्वास्थ्यम २०२३’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आली. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या हर्णे गुरुजी विद्यालयातही ही स्पर्धा घेण्यात आली. या वेळी प्राथमिक मराठी तिसरी, चौथी आणि माध्यमिक इंग्रजीचे सातवी-आठवीचे विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. ‘कलाकार आपल्या भेटीला’ अंतर्गत ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’चे कलाकार जान्हवी किल्लेकर आणि अमित रेखी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले आणि सुदृढ राहावे, यासाठी ‘सकाळ स्वास्थ्यम २०२३’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वांद्रे येथील हर्णे गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांना दोन्ही कलाकारांनी योगा, चांगला आहार, स्वच्छता आणि शिक्षण घेताना आपले मन कशा पद्धतीने एकाग्र करावे, याचे मार्गदर्शन केले. व्यायाम आणि योगामध्ये काय फरक आहे, असा प्रश्न आर्यन पवार या विद्यार्थ्याने विचारला. त्यावर कलाकार अमित रेखी याने उत्तर देताना सांगितले, की योगा आपल्या शरीराला संपूर्णपणे बदलून टाकतो. व्यायाम म्हणजे अतिमेहनत घेऊन केलेले काम. निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घ्यायला हवा. फळभाज्या, पालेभाज्या खायला हव्यात. जास्तीत जास्त स्वच्छता राखायची, मानसिकरीत्या आनंदी राहायला शिका, असा सल्ला अमितने विद्यार्थ्यांना दिला.
या वेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शिल्पा अष्टमकर, माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनिता डिसिल्वा उपस्थित होत्या. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन क्षमा पावले यांनी केले.
----
यशासाठी मेहनत घ्यावी लागते, तीच मेहनत घेऊन कलाकार उंच शिखरावर पोहोचतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही मेहनत घेतली पाहिजे. आपले लक्ष्य साध्य केले पाहिजे.
- शिल्पा अष्टमकर, मुख्याध्यापिका