
जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर
ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सहायक आयुक्तांवर बुधवारी (ता. १५) जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली. गुरुवारी त्यांनी ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात आज (ता. १७) हजर केले असता कोठडीत तीन दिवसांनी वाढ करण्यात आली; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर नौपाडा पोलिस ठाण्यात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात गोवल्याचा आरोप करत आव्हाड यांच्या वतीने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. हल्लाप्रकरणी पोलिसांनी अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांना अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना पुन्हा सोमवारी (ता. २०) ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.