
गरजूंचे पोट भरणारी धान्य बँक
नितीन पाटील, मुंबई
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुख्य गरजा! माणसाचे सुसह्य जगणे या तीन घटकांवर अवलंबून आहे. चंद्रमौळी झोपडी आणि अंगावर फाटलेले कपडे लेवून जगणे काहीसे कठीण; पण त्याहूनही पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असताना उपाशीपोटी किती काळ तग धरणार? आज हाता- तोंडाची मारामारी असणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अशांना आस आहे ती, पोटाची खळगी भरण्यासाठी मायेने दोन घास घेऊन येणाऱ्यांची! हेच काम गेली आठ वर्षे ‘वुई टुगेदर फाऊंडेशन’ ही संस्था ‘धान्य बँकेच्या’ माध्यमातून करीत आहे.
‘धान्य बँक’ ही संकल्पना तशी अभिनव, आगळीवेगळीच! याच अनोख्या संकल्पनेतून वुई टुगेदर फाऊंडेशनने गेल्या आठ वर्षात मुंबईसह राज्यभरातील हजारो भुकेलेल्यांच्या मुखी घास भरवण्याचे फार मोठे कार्य केले आहे. पैशाची जशी बँक असते तशी ती धान्याची बँक असू शकते, हे वुई टुगेदरने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
‘मिळून साऱ्याजणी उभारती धान्याच्या राशी, वंचिता मुखी घास भोवती’ ही टॅगलाईन अंगीकारत उज्ज्वला बागवाडे यांनी २०१५ मध्ये उपाशीपोटी भुकेने तडफडणाऱ्यांच्या मुखी मायेचा घास कसा घालता येईल, याविषयी मनाशी एक स्वप्न पाहिले. ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी त्यांनी प्रथम ‘वुई टुगेदर धान्य बँक’ हा मैत्रिणींचा गट सुरू केला. त्यांची ही धान्य बँकेची अभिनव कल्पना त्यांच्या मैत्रिणींनीच नव्हे, तर समाजानेही उचलून धरली. पुढे ‘वुई टुगेदर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेची अधिकृत स्थापना झाली. उज्ज्वला बागवाडे यांनी लावलेल्या या एका छोट्याशा रोपट्याचे आज एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. फाऊंडेशनने गेल्या आठ वर्षांत समाजातील अनेक दानशूरांच्या मदतीने धान्याच्या राशी नुसत्या जमविल्याच नाहीत, तर ज्यांना खऱ्या अर्थाने धान्याची गरज आहे, अन्नधान्याअभावी ज्यांची उपासमार होत आहे, अशा सर्वांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे गोळा केलेले धान्य गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम फाऊंडेशन सातत्याने करीत आहे. आणि त्यांच्या या कार्याला समाजातून मोठे सहकार्य ही लाभत आहे.
‘देणे समाजाचे’ने दिले बळ
समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजातील दान देणाऱ्यांमधील महत्त्वाचा आणि विश्वसनीय दुवा म्हणून काम करणाऱ्या ‘देणे समाजाचे’ संस्थेच्या माध्यमातून या फाऊंडेशनची नाळ अधिक दानशूरांशी जोडली गेली आहे. त्यामुळे संस्थेच्या कार्याला ‘देणे समाजाचे’ माध्यमातून अधिक बळ मिळाले आहे.
३० संस्थांचे पालकत्व
वुई टुगेदर फाऊंडेशनच्या धान्य बँकद्वारे समाजातील विविध उपेक्षित, वंचित, शोषित घटकांसाठी अतिशय प्रामाणिक आणि निस्वार्थपणे चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना धान्याच्या रूपाने मदत केली जाते. या धान्य प्रकारात गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये, साखर, चहा पावडर, येथपासून तेल, मसाल्याचे पदार्थ आदी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असतो. संस्थेने आतापर्यंत मुंबईसह राज्यातील ३० स्वयंसेवी संस्थांचे पालकत्व स्वीकारत गेल्या आठ वर्षांपासून या संस्थांच्या माध्यमातून उपासमार होणाऱ्या बालक, माता, वृद्ध अशा सुमारे १५ हजाराहून अधिकांना दरमहा धान्य पुरवण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे.
असे चालते कार्य
संस्थेच्या सेक्रेटरी आरती भार्ज आपल्या सहकारी भगिनींच्या सोबत वेगवेगळ्या भागातील संस्थांना भेटी देऊन त्यांच्या प्रत्यक्ष कामाची माहिती करतात. तेथील उपासमार होणाऱ्यांची संख्या निश्चित करतात. त्यांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या संस्थांमार्फत गरजूंना वर्षभर फाऊंडेशन मार्फत धान्य पुरवले जाते.
चार हजार अन्नदाते
मिळून साऱ्याजणी या उक्तीप्रमाणे या कार्यासाठी शेकडो महिला कार्यकर्त्या स्वयंस्फूर्तीने कार्य करीत आहेत. या संस्थेने विश्वास आणि प्रामाणिक कार्याच्या बळावर नुसती कार्यकर्त्यांचीच फौज निर्माण केली आहे असे नव्हे तर गेल्या आठ वर्षांत संस्थेने समाजातील सुमारे चार हजाराहून अधिक अन्नदाते आपल्याशी जोडले आहेत. समाजातील हे सहृदयी दाते जे धान्य दान करतात अथवा त्यासाठी धन स्वरूपात डोनेशन देतात, त्यांच्या बळावर संस्थेचे कार्य झपाट्याने सुरू आहे. फाऊंडेशनमार्फत पालकत्व स्वीकारलेल्या कोणत्याही संस्थेला पैसे दिले जात नाहीत; तर धान्य स्वरूपातच मदत दिली जाते.
अन्न, ही प्रत्येक मनुष्याची प्राथमिक गरज आहे. गरजू निवासी असणाऱ्या संस्था जर जेवणा–खाण्याच्या विवंचनेत राहिल्या तर त्यांच्या कार्याचा वेग मंदावतो. त्यांना मदत मिळावी म्हणून महिलांनी आपले किचन विस्तारणे आणि आपण जसे आपले किराणा भरतो तसा या संस्थेचा शिधा भरून द्यावा, हा उदात्त हेतू या धान्य बँके मागील आहे. म्हणूनच अन्नपूर्णेचा हा वसा अविरत सुरू आहे.
– आरती भार्ज, सेक्रेटरी, वुई टुगेदर फाऊंडेशन, धान्य बँक