
नवी मुंबईकरांच्या सुरक्षेचे आव्हान
वाशी, ता. १८ (बातमीदार)ः नवी मुंबई शहराची अंदाजित लोकसंख्या १५ लाख ४३ हजारांच्या घरात आहे; तर पनवेल आणि उरणमधील लोकसंख्या धरता जवळपास ३० लाख लोकसंख्या असलेल्या विभागाच्या सुरक्षेची जबाबदार नवी मुंबई पोलिसांवर आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत नवी मुंबई पोलिस दलाचे मनुष्यबळ १० टक्केही नसल्याने शहराच्या सुरक्षेचा भार ४ हजार ८११ कर्मचाऱ्यांवर आहे.
नवी मुंबई पोलिस दलात दोन सहायक पोलिस आयुक्तांसह ३१८ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सध्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत आहे, त्यात पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलिस सहआयुक्त संजय मोहिते, अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश घुर्ये, पोलिस उपायुक्तांमध्ये अमित काळे (गुन्हे शाखा), तिरुपती काकडे (वाहतूक शाखा), संजयकुमार पाटील (मुख्यालय), प्रशांत मोहिते (विशेष शाखा), विवेक पानसरे (परिमंडळ-१) व पंकज डहाणे (परिमंडळ-२) म्हणून कार्यरत आहेत; तर मंजूर सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ११ पदांपैकी ९ पदांचा कारभार अधिकाऱ्यांना देण्यात आला असून दोन रिक्त पदांचा कारभार दोघा अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे; तर अकरा अधिकाऱ्यांमध्ये वाशी विभागाचे एसीपी धुळा टेळे, तुर्भेचे गजानन राठोड, पनवेल विभाग भागवत सोनावणे, बंदर विभाग धनाजी क्षीरसागर, गुन्हे शाखा विनायक वस्त, मानवी तस्करीविरोधी युनिटचे शैलेष पासलवार, बिनतारी संदेश विभागाचे एसीपी गिरी ठाकरे काम पाहत असून एसीपी मिलिंद वाघमारे यांच्याकडे अतिक्रमणसोबत प्रशासनाचा; तर राहुल गायकवाड यांच्या विशेष शाखेबरोबर वाहतूक शाखेचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराची वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबई पोलिसांचे बळ तोकडे पडत असल्याने शहरवासीयांच्या सुरक्षेवर त्याचा परिणाम झाला आहे.
-------------------------------------------
पदनाम मंजूर कार्यरत रिक्त
एसीपी ११ ९ २
पो.निरीक्षक ८२ ७७ ५
सहा.पो.निरी. १९१ १७४ १७
पो.उप.निरी. २२४ १७२ ५२
सहा.उप.निरी. २८१ २८० १
हेड कॉन्स्टेबल १४८८ १४८४ ४
पो.हवालदार २८४३ १९०९ ९३४
-------------------------------------------------
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, ही बाब खरी आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस दलात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने गृहमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होतील.
- मिलिंद भारंबे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई
---------------------------------------------