सेतू सहकाराचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेतू सहकाराचा
सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

sakal_logo
By

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

परदेशस्थ सदस्यांना दंड-व्याजात सवलत मिळू शकते का?

प्रश्न - मी एका सहकारी गृहनिर्माण संस्थेची सभासद आहे; परंतु मी स्वतः परदेशात राहत आहे. माझी सदनिका बंद असते, त्याचे देखभाल शुल्क देण्याची जबाबदारी एका वकील संस्थेवर देण्यात आली होती; परंतु काही कारणाने त्यांनी ती पार पाडली नाही व माझ्याविरुद्ध संस्था थकबाकीदार म्हणून कार्यवाही करीत आहे. माझ्या सदनिकेची गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी आहे. मी सर्व पैसे देण्यास तयार आहे; परंतु संस्था सर्व पैसे व्याजासह वसूल करते आहे. परदेशात राहणाऱ्या सदस्यांना व्याज न भरण्यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का?
- प्रतिमा मुजुमदार

उत्तर - संस्थेचा कारभार मंजूर उपविधीनुसार चालत असल्याने त्यात कोणतीही सूट किंवा दुजाभाव करण्याची व्यवस्था नाही. परदेशात राहणाऱ्या सभासदांना काही विशिष्ट तरतूद नाही, त्यामुळे इतर सभासदांना लागणारे सर्व नियम परदेशात राहणाऱ्या सभासदांनाही लागू आहेत. आपण परदेशात असल्याने अशा वेळी सभासद म्हणून आपल्या सदनिकेच्या देय रकमेची व्यवस्था ज्या ठिकाणी आपले घर आहे त्या ठिकाणी शेजारच्या व्यक्ती, सभासद, नातलग किंवा विश्वासू मित्रमंडळी यांच्यामार्फत किमान महिन्याची देय रक्कम संस्थेमध्ये पोहोचती करण्याची सर्व जबाबदारी ही तुमच्यावरच आहे. संस्था दर महिन्यात बिलांची व्यवस्था करते व ती सर्व सभासदांना देते. जर महिन्याचे बिल भरले नाही, तर त्यावर व्याज आकारणीची तरतूद मंजूर उपविधीमध्ये आहे. त्यामुळे देय रकमेवर संस्था व्याज आकारू शकते, यात कोणतेही कायद्याचे उल्लंघन नाही. परदेशस्थ व्यक्तींसाठी देयके न भरल्यास व्याज न आकारण्याची तरतूद नाही. त्यामुळे संस्थेची कृतीही योग्य व कायदेशीर आहे. या परिस्थितीत तुम्ही असे पाहिले पाहिजे, की आपण परदेशात असताना केवळ सदनिका ही गृहनिर्माण संस्थेमध्ये असल्याने सुरक्षित आहे व त्याची देखभाल होत आहे. त्यामुळे आपण संस्थेची सर्व थकबाकी व्याजासह भरून संस्थेला सहकार्य करावे. आपण यापुढे थकबाकीदार होऊ नये, यासाठी आपण संस्थेकडे संपूर्ण वर्षाची रक्कम आगाऊ द्यावी, म्हणजे व्याज आकारणी होणार नाही. आपण व्याज न देण्यासाठी कायद्याच्या पळवाटा न शोधता संस्थेस सहकार्य करावे.

प्रश्न - सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये नामनिर्देशन प्रक्रियेमधून माझे नाव सभासद म्हणून नोंदविण्यात आले आहे. संस्थेमध्ये पुनर्विकास प्रक्रिया सुरू आहे, मला त्या प्रक्रियेचा भाग होता येईल का? तसेच पुनर्विकास सभांना हजर राहून मतदान करता येईल का?
- अभिनव पानसे, बोरिवली.

उत्तर - नामनिर्देशनाद्वारे सभासद होणारी व्यक्ती ही महाराष्ट्र सहकारी कायद्यात २०१९ मध्ये झालेल्या बदलानुसार अधिकृत सभासद असते. त्या व्यक्तीला सभासदाचे सर्व अधिकार व हक्क असतात. अशा व्यक्तीचे नाव सभासद नोंदवह्यांमध्ये येते, तसेच भाग दाखल्यावरदेखील नोंदविण्यात येते. अशी व्यक्ती संस्थेच्या सर्वसाधारण सभांना अधिकाराने उपस्थित राहू शकते, त्या सभांमध्ये संपूर्णपणे सहभागी होऊ शकते व त्यात मतदानदेखील करू शकते. अशा व्यक्तीने केलेले मतदान हे वैध (योग्य) म्हणूनच स्वीकारले जाते. अशी व्यक्ती संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक लढू शकते व पदाधिकारीसुद्धा होऊ शकते. या सर्वच बाबी लक्षात घेता आपण जरी संस्थेत नामनिर्देशनाद्वारे सभासद झाला आहात तरीसुद्धा आपल्याला पुनर्विकास प्रक्रियेमध्ये निश्चितपणे अधिकारवाणीने भाग घेता येईल, तसेच सर्व सभांना उपस्थित राहून मतदान करता येईल. केवळ आपण आपली सदनिका विक्री करू शकणार नाही.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील इ मेल वर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in