
भेळविक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा घाट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : तलावपाळीलगत व्यवसाय करणाऱ्या भेळविक्रेत्यांचे महात्मा गांधी उद्यानालगत पुनर्वनस करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. खाऊ गल्लीच्या नावावर होणाऱ्या या पुनर्वसनाला स्थानिक इमारतींमधील रहिवाशांकडून तीव्र विरोध केला जात आहे. वेळप्रसंगी रहिवाशांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तलावपाळीलगत मोठ्या संख्येने भेळ विक्रेते हातगाड्यांवर व्यवसाय करीत होते. या विक्रेत्यांकडून खरकटे व कचरा तलावात टाकला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी कचराही साचून दुर्गंधी पसरत होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानंतर भेळविक्रेत्यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर तलावपाळीच्या परिसराने मोकळा श्वास घेतला होता. तसेच हटवलेल्या भेळविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. तलावपाळीलगतच्या महात्मा गांधी उद्यानात भेळविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. त्यानुसार या ठिकाणी नुकतीच आयुक्त अभिजीत बांगर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.
---------------
आयुक्तांना निवेदन
गांधी उद्यानालगत परिसराची शांतता भेळविक्रेत्यांमुळे धोक्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विक्रेते व नागरिकांचा रात्री उशीरापर्यंत वावर असल्यामुळे रहिवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी केसरवाडी ट्रस्ट, कर्णबधीर विद्यालय आहे. त्यांनाही फेरीवाल्यांचा फटका बसण्याची भीती आहे. या प्रस्तावाला राज हॉल, मोती बाजार बिल्डिंग, रुक्मिणी वामन बिल्डिंग, ब्राह्मण सभा, गुरु छाया बिल्डिंग, भरत भवन बिल्डिंग येथील रहिवाशांचा विरोध आहे. त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना निवेदन दिले आहे.