कळव्यात सरकता जिना बंदावस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात सरकता जिना बंदावस्थेत
कळव्यात सरकता जिना बंदावस्थेत

कळव्यात सरकता जिना बंदावस्थेत

sakal_logo
By

कळवा, ता. १८ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत कळवा स्थानकात फलाट क्रमांक दोनवरील सरकता जिना बंद पडत असल्याने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, आजारी रुग्णांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कळवा स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी ठाण्याच्या दिशेने फलाट क्रमांक दोनवर सरकता जिना बसवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा जिना सकाळी व संध्याकाळी बंद असतो. त्यामुळे प्रवशांना उंच जिना चढून जावे लागत आहे. फलाट क्रमांक दोनवरून उतरून कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्र्यावरून कळवा, खारेगाव व ऐरोली आयटीपार्क मध्ये कामावर जाण्यासाठी हजारो प्रवासा दररोज जात असतात. तसेच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मुंब्रा, दिव्यातून हजारो रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी जात असतात; मात्र हा सरकता जीना बंद पडत असल्याने त्यांना धापा टाकत हा उंच जिना चढून जावे लागत आहे. प्रवाशांनी या संदर्भात कळवा रेल्वेस्थानक अधिकाऱ्यांना वारंवार निदर्शनात आणून देऊनही त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

-------------------
मुले खेळत असल्याने जिना बंद
रेल्वे स्थानकातील जिन्यावर स्थानकालगतची झोपडपट्टीतील मुले खेळायला येत असल्याने हा सरकता जिना बंद करून ठेवावा लागत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. असे असेल तर तेथे बंदोबस्तावर असलेले रेल्वे सुरक्षा रक्षक काय करतात? असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे. हा सरकता जिना दिवसभर व रात्री किमान १० वाजेपर्यंत गर्दीच्या वेळी नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी येथील प्रवशांनी केली आहे.

कळवा रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचा मेटंनन्स व सर्व्हिसिंग न झाल्याने तो जिना बंद पडतो. जिन्याच्या दुरूस्तीसंदर्भात संबधित ठेकदारास कळवले आहे. येत्या दोन दिवसात हा जिना नियमीत सुरू होईल.
- व्ही. ऐस. वर्मा, प्रबंधक, कळवा रेल्वे स्थानक