
वाहनांच्या फिटनेस पासिंग दरवाढीमुळे नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : केंद्र सरकारने १५ वर्षांवरील वाहनांच्या फिटनेस पासिंगसाठी दरवाढीची घोषणा केली आहे. जुन्या दराच्या तुलनेत नवीन दर अनेक पटीने वाढवण्यात आल्याने वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नवीन दर १ एप्रिलपासून राज्यासह देशभरात लागू होणार असल्याने केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी राज्यातील वाहतूकदारांकडून केली जात आहे. यासंदर्भात जळगाव येथील वाहतूकदारांनी निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नवीन दरवाढीसंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्र्यांना दरवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले; मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. दरवाढीचा निर्णय भांडवलशाहीकडे जाणारा आहे. सर्वाधिक ग्रामीण भागातील नागरिक व वाहतूकदार यांना आर्थिक बोजा वाढणारा आहे. त्यामुळे अनेक छोटे वाहतूकदार बेरोजगार होण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
वाहनांचा प्रकार जुनी फी नवीन फी (रुपयांत)
ट्रक ८०० १३,०००
मालवाहतूक ६०० ७,५००
रिक्षा ६०० ३,५००
दुचाकी ३०० १,९५०
कार ६०० ६,०५०