
गेट वे ऑफ इंडिया परिसराला मिळणार पॅनोरमा इफेक्ट
‘गेट वे’ परिसराला पॅनोरमा इफेक्ट!
ऐतिहासिक वास्तूदरम्यानचे अडथळे पालिका हटवणार
किरण कारंडे, मुंबई
मुंबईत येणारा पर्यटक ‘गेट वे ऑफ इंडिया’ला हमखास भेट देतो. अनेकदा तिथे गर्दी होते. अनेक अडथळ्यांमुळे पर्यटकांना वास्तू नीट पाहता येत नाही. म्हणूनच पर्यटकांना ‘गेट वे ऑफ इंडिया’चे दर्शन परिसरात कुठूनही होण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका लवकरच सर्व अडथळे दूर करणार आहे. त्यामुळे ‘गेट वे’समोरील रस्त्यावरूनही संपूर्ण वास्तू सहज नजरेस पडणार आहे.
‘गेट वे ऑफ इंडिया’ म्हणजे मुंबईची शान आहे. पर्यटकांचा तिथे सतत राबता असतो. मात्र, सध्या अनेक प्रकारच्या अतिक्रमणांमुळे ‘गेट वे’ची वास्तू झाकली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत नव्या बदलांसह ‘गेट वे’चा परिसर पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. वास्तूच्या परिसराला पॅनोरमा इफेक्ट देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
मुंबईत सार्वजनिक सुट्ट्या, वीकेंड, दिवाळी अन् उन्हाळी रजेच्या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. ‘गेट वे’च्या वास्तूच्या परिसरातील अतिरिक्त जागेत मिळत्याजुळत्या अशा स्वरूपाचे बांधकाम येत्या काळात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने त्या अनुषंगाने एक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सुशोभीकरणाच्या कामासाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबई पालिकेतर्फे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुरक्षा चौक्यांचा विकास करणे अपेक्षित आहे. सध्याची सुरक्षा चौकी हटवत नव्या ठिकाणी ती बसवण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे गेट वे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वाराच्या नक्षीकामाची मिळतीजुळती रचना चौकीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. वास्तुविशारद आभा लांबा यांनी त्याचे काम हाती घेतले आहे. वास्तूला शोभेल अशा स्वरूपाचे नवे बांधकाम परिसरात करण्यात येणार आहे. शिवाय वास्तूची डागडुजी आणि देखभालीचे काम पुरातत्व विभागाकडून करण्यात येईल. सुमारे १०० मीटर परिसरातील देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाची असणार आहे.
काय कामे होणार?
- ‘गेट वे’ची वास्तू दिसण्यात परिसरातील तिकीट काऊंटर, टॉयलेट ब्लॉक आणि सुरक्षा चौकी अडथळे ठरत आहेत. सुशोभीकरणादरम्यान ते हटवण्यात येणार असून त्या ठिकाणी सरसकट कुठूनही वास्तू दिसेल अशा स्वरूपाची रचना केली जाईल.
- अनेक दिशांनी ‘गेट वे’ची वास्तू पर्यटकांना पाहता यावी, असाच उद्देश कामाच्या निमित्ताने ठेवण्यात आला आहे. कामासाठी हेरिटेज समितीमार्फत ना-हरकत प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने मिळवले आहे. त्यामुळे निविदाप्रक्रियेचा भाग असलेल्या कामांना आता सुरुवात होणार आहे.
- गेट वे ऑफ इंडिया वास्तूच्या परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब आहेत. प्रकाशयोजनेसाठी असे पथदिवे लावण्यात आले आहेत; परंतु आता त्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे. नव्या पोलवरून सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना अशा दोन्ही पद्धतीची सुविधा देण्यात येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा परिसरातील पुतळाही सर्व बाजूंनी पाहता येईल, अशा स्वरूपाचे काम येत्या काळात करण्यात येणार आहे.
स्टॉलचालकांना परिसरातच पर्यायी जागा
मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने सुचवलेल्या शिफारशींनुसार गेट वे परिसरात कोणतीही वृक्षतोड करता येणार नाही. त्यामुळे वास्तू दिसण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये तोदेखील महत्त्वाचा घटक असणार आहे. स्टॉल किंवा टॉयलेट ब्लॉक मात्र जमीनदोस्त करत त्यासाठी पर्यायी जागांचा विचार पालिकेने केला आहे. त्यामुळे सध्या अडथळा ठरणारे तिकीट काऊंटरचे स्टॉल नव्या कामानुसार दिसणार नाहीत. मुंबई महापालिकेच्या अ विभागाने संबंधित स्टॉलचालकांना नजीकच्या परिसरातच पर्यायी जागा देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे स्टॉलधारकांच्या रोषालाही पालिकेला सामोरे जावे लागले आहे.