
ठाण्यात शिवभक्तीचा उसळला सागर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : हर हर महादेव.... बम बम भोले...चा जयघोष करत ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर, डोंबिवली येथील पिंपळेश्वर, खिडकाळेश्वर मंदिर, कल्याणच्या पारनाक्यावरील शिवमंदिरसह जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. योवळी अनेक स्वयंसेवी संस्थांसह दानशूर व्यक्तींनी भाविकांसाठी फळहार आाणि थंडपेय वाटपाचे आयोजन केले होते.
कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर पहिल्यांच या वर्षी सर्वच सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहेत. याला महाशिवरात्रीचे पर्वही अपवाद राहिले नाही. उलट यावर्षी नेहमीपेक्षा जास्त भाविकांची गर्दी सर्वच शिवमंदिरांमध्ये दिसून आली. पहाटेपासूनच सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी दहानंतर उन्हाचा पारा वाढला असतानाही भाविकांचा उत्साह तसाच होता. दुसरीकडे आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिरांना सजवण्यात आले होते. यावर्षी समाधानाची बाब म्हणजे अनेक मंदिरांमध्ये दुग्धाभिषेक न करता बेलपत्र व फुले वाहून भाविकांनी आपली श्रद्धा अर्पण केली. त्यामुळे दरवर्षी वाया जाणाऱ्या दुधाचे प्रमाण यावर्षी कमी झालेले दिसले.