
बालनाट्य चळवळीसाठी ‘राजाश्रय’ गरजेचा!
कपिल प्रभू : सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १८ : बाल रंगभूमीवरील अनंत अडचणींना तोंड देत जी काही मूठभर मंडळी येथे कार्यरत आहेत; मोठ्या चिकाटीने बालनाट्य करीत आहेत, त्यांना ‘राजाश्रय’ मिळणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांनी व्यक्त केले. मुंबईतील बालरंगभूमी अभियान, फुलोरा नाट्य संस्था, बेळगाव येथील अखिल भारतीय नाट्य परिषद आदींच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे आज दोनदिवसीय बालनाट्य संमेलनाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या वेळी अध्यक्षीय भाषणात नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले. तत्पूर्वी या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगाव येथील संत मीरा इंग्लिश स्कूलमध्ये बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची सुरुवात शनिवारी (ता. १८) संत मीरा शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या नाट्य दिंडीने झाली. संमेलन अध्यक्षा मीना नाईक, बालरंगभूमी अभियान, फुलोरा नाट्य संस्थेच्या अध्यक्षा वीणा लोकूर, अखिल भारतीय नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे, डॉ. राजेंद्र चव्हाण, देवदत्त पाठक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. संध्या देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये बेळगावमधील नाट्य परंपरेची माहिती दिली. वीणा लोकूर यांनी मागील दोन बालनाट्य संमेलनाचे अनुभव सांगून बेळगाव येथील बालनाट्य संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या वेळी ‘मूषकनगरी’ आणि ‘जादूची बासरी’ व ‘अविस्मरणीय’ ही दोन बालनाट्ये सादर करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात नाईक यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. बालनाट्य करण्यासाठी, कार्यशाळा घेण्यासाठी एक छोटेखानी थिएटर आवश्यक आहे. त्याचे भाडे सवलतीच्या दरात असावे. त्यासाठी जाहिरातींमध्येही सवलत मिळायला हवी. व्यावसायिक नाटक मंडळींनी बालरंगभूमी चळवळीला हातभार लावावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालनाट्य लेखक निर्माण व्हायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विचारमंथनातून खूप काही निर्माण होऊ शकते. सांस्कृतिक विभागाने व्यावसायिक नाटक कंपन्यांना वर्षातून एक तरी बालनाट्य निर्मिती करण्याची अट घातली पाहिजे, अशी थेट मागणी नाईक यांनी या वेळी केली.
उदासीनता कधी नष्ट होणार?
बालनाट्याला चांगल्या नाट्यगृहात चांगल्या तारखा, वेळ मिळणे आवश्यक आहे, असे सांगत मीना नाईक यांनी परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्राधान्याने स्थान दिले जाते. मग आपल्याकडील ही उदासीनता कधी नष्ट होणार, असा प्रश्न उपस्थित केला. आपण उघड्या डोळ्यांनी बालनाट्याकडे कधी बघणार, मुंबईसारख्या ठिकाणी बालनाट्यासाठी एकही छोटेखानी परवडण्याजोगे भाडे असणारे नाट्यगृह नाही. अशा बालरंगभूमीच्या चळवळीला चालना देण्यासाठी वीणा लोकूर यांनी हे बालनाट्य संमेलन आयोजित केल्याचेही मीना नाईक यांनी सांगितले.