शिवसेना भवनात शांतता

शिवसेना भवनात शांतता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काहीसे चिंतेचे वातावरण पसरले होते; मात्र सामान्य कार्यकर्त्यांचा जोश अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.

आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवनात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे शांतपणे नियोजन सुरू होते. शुक्रवारी (ता. १७) रात्री निर्णय आल्यानंतर शिवसेना भवनात थोडी चलबिचल जाणवत होती; मात्र दिवस उजाडताच परिस्थिती सामान्य झाली. आज (ता. १८) दुपारी शिवसेना भवनातील पदाधिकारी आश्वस्त असल्याचे दिसले. या निर्णयाचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसेल, अशी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होतीत; मात्र मुख्यालयात शांततेत पक्षाचे काम सुरू होते.

स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने २७ फेब्रुवारीला मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी भाषा दिनानिमित्ताने कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. शिवसेना भवनात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी इतर चर्चा सोडून नियोजनाचे काम करण्यात व्यग्र होते. उद्धव ठाकरे या कार्यक्रमातून पुढील राजकीय वाटचालीवर भाष्य करणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे सखोल नियोजन सुरू आहे.

आज महाशिवरात्र असल्यामुळे मुख्यालयात फारशी वर्दळ नव्हती; मात्र शिवसेना भवनाच्या आजूबाजूला पोलिस सुरक्षा वाढवल्याचे दिसत होते. शिवसेना भवनाशेजारी राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजूनही आपल्या बाजूने येईल, अशी आशा सामान्य शिवसैनिक व्यक्त करत होते.

जे व्हायचे होते, ते झाले...
काही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या भविष्यावर विचारल्यावर त्यांनी जे व्हायचे होते, ते झाले, आता होऊन जाऊ दे, चिंता नाही, असे बिनधास्त उत्तर दिले. मुंबईत पसरलेल्या शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे ताब्यात घेतील, याची भीती सामान्य शिवसैनिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली; मात्र बहुतांश शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टचे आहे. त्यामुळे शिवसेना भवन ताब्यात घेऊ शकत नाही, याबद्दल आश्वस्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com