
दक्षिण मुंबईत महाशिवरात्री उत्साहात साजरी
मुंबादेवी, ता. १८ (बातमीदार) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने दक्षिण मुंबईत शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने भरून गेली होती. ‘पार्वती पतये हर हर महादेव’ अशा जयघोषात शिवलिंगावर बेल, फुले आणि पंचामृताचा अभिषेक भाविकांनी केला.
शिवमंदिरात भाविकांनी शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दही, तूप, मध, साखरमिश्रित पंचामृत अर्पण करीत जलधारांनी शिवाभिषेक केला. काही मंदिरांमध्ये रुद्र अष्टाध्यायीचे पठण करण्यात आले; तर काही ठिकाणी शतपथ ब्राह्मण ग्रंथ रचित मंत्रोच्चाराने शिवअर्चना आणि महाभिषेक करण्यात आला. रुद्र सूक्त, नमक चमक यांची आवर्तनेही करण्यात आली. कुंभारवाडा येथील नागेश्वर शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी उपवासाचे पदार्थ, फळे वाटली जात होती. भायखळा पोलिस ठाण्याजवळ असलेले हंसराज करमसिंग चॅरिटेबल ट्रस्ट संचालित २०० वर्षापेक्षा जास्त पुरातन असलेले माणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी श्री माणकेश्वर हरिपाठ भजन मंडळाकडून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबुलनाथ मंदिरात दर्शनाला भाविकांची रांग
गिरगाव चौपाटीजवळच्या बाबुलनाथ शिव मंदिराजवळ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भाविकांची मोठी दर्शन रांग सकाळपासूनच पाहायला मिळाली. टेकडीवाले बाबुलनाथ महाराज की जय, पार्वती पतये हरहर महादेव अशा घोषणांनी बाबुलनाथ परिसर दुमदुमत होता. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई आणि मंदिरातील मूर्तींना आकर्षक फुलांची सजावट केली होती.
कोरोनानंतर दर्शनासाठी उत्साह
कोविड प्रतिबंध हटल्यानंतर दोन वर्षांनंतर भाविकांनी जल्लोषपूर्ण उत्साहात महाशिवरात्री साजरी केली. उमरखाडी येथील शिव मंदिरात खास बर्फाच्या मोठ्या लादीतून आकर्षक शिवलिंग साकारले आहे.