
गांधी शाळेत साकारले किल्ले
अंबरनाथ, ता. १९ (बातमीदार) : शिवजयंतीनिमिताने अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ले साकारले असून या किल्ले प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व समजावे त्यातून त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची बीजे रोवली जावीत या उद्देशाने दोनदिवसीय किल्ले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद शिशुवाटिका, बालभवन मराठी प्राथमिक शाळा, महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैविध्यपूर्ण किल्ल्यांपैकी रायगड, तोरणा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी आणि जंजिरा आदी १० किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे. मुख्याद्यापक संतोष भणगे यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत केले. अशोक कुलकर्णी, दिलीप कणसे, प्रतीक बनोटे आदी या वेळी उपस्थित होते.