अनधिकृत ‘नळां’वर तिप्पट आकारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत ‘नळां’वर तिप्पट आकारणी
अनधिकृत ‘नळां’वर तिप्पट आकारणी

अनधिकृत ‘नळां’वर तिप्पट आकारणी

sakal_logo
By

वसई, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात अवैधपणे घेतलेल्या अनधिकृत नळजोडण्या नियमित करण्यासाठी प्रशासकाने सर्वसाधारण सभा घेऊन मान्यता दिली आहे. त्यामुळे अवैध नळजोडण्यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र त्यावरील आकारणी तिपटीने वसूल केली जाणार आहे. तसेच जर अनधिकृत नळजोडणी अधिकृत केली नाही, तर कारवाईचा इशारादेखील प्रशासनाने दिला आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाणी येत नसल्याने नागरिक थेट पालिकेत धडकत आहेत. फेब्रुवारी महिन्यात चार पाण्यासाठी मोर्चे तसेच नागरिकांनी पालिकेला निवेदन, तक्रारीचा पाढा वाचत पाणी कमरतेचे म्हणणे मांडले आहे. त्यातच अनेक जण अनधिकृत नळजोडणीचा वापर करून फुकट पाणी वापरत महापालिकेचा महसूल बुडवत आहेत. त्यांच्यामुळे अनेक भागात अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकृतपणे पाणीपट्टी भरणाऱ्या करदात्यांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी प्रशासनाने बैठक घेत ठराव मांडला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
वसई विरार शहर महापालिकेने सर्वसाधारण सभा ठराव क्र.९ अन्वये जरी नळजोडण्यांना अधिकृत करण्याचा ठराव केला असला तरी मात्र अशा जोडण्या नियमित करण्यासाठी तिप्पट दराने नळजोडणी आकार वसूल करण्यात येणार आहे. ही आकारणी त्वरित पाणीपट्टीतून वसूल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त प्रति नळजोडणी एक हजार ५०० व रस्ते खोदाई करण्यासाठी एक हजार रुपये वसूल केले जाणार आहेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
कारवाईचा इशारा
अनधिकृत नळजोडणी धारक जर नळजोडणी नियमित करण्यासाठी रक्कम भरणा करण्यास तयार नसल्यास, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४६८ अन्वये शास्तीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत नळजोडणी घेणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था पदाधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. मुदतीनंतर निदर्शनास येणाऱ्या अनधिकृत नळजोडण्यांवर सर्वसाधारण सभा ठराव क्र. ०९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील वसई विरार महापालिका प्रशासनाने दिला आहे.
--------------------
अनधिकृतपणे असणारी जोडणी अधिकृत करता यावी म्हणून महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज करणे गरजेचे आहे. दिलेल्या मुदतीत जर सोपस्कार पूर्ण केले नाहीत, तसेच त्यानंतर केलेल्या तपासणीत अनधिकृत नळजोडणी आढळली तर कारवाई करण्यात येणार आहे.
- गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, महापालिका