सिडकोची अग्निशमन यंत्रणा बिनकामाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोची अग्निशमन यंत्रणा बिनकामाची
सिडकोची अग्निशमन यंत्रणा बिनकामाची

सिडकोची अग्निशमन यंत्रणा बिनकामाची

sakal_logo
By

खारघर, ता. १९ (बातमीदार) : तळोजा फेज दोनमध्ये सिडकोने उभारलेल्या गृहसंकुलातील केदार सोसायटीच्या तेराव्या मजल्यावर शनिवारी (ता. १८) रात्री आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरातील सर्व साहित्य मात्र जळून खाक झाले. विशेष म्हणजे, सिडकोच्या इमारतीत असलेली अग्निशमन यंत्रणा बिनकामाची असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे.
तळोजा फेज दोनमध्ये सिडकोने सेक्टर एकवीसमध्ये उभारलेल्या केदार गृहसंकुलातील एल आठ इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भाड्याने वास्तव्य करणाऱ्या अजय बिलोड यांच्या घरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास आग लागली होती. या वेळी इमारतीतून धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच तेराव्या मजल्यावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र, बिलोड कुटुंबातील सदस्य दिवाबत्ती करून किराणा आणण्यासाठी बाहेर गेल्यामुळे दरवाजा बंद असल्याने काहीच करता येत नव्हते. अखेर याबाबतची माहिती खारघर आणि कळंबोलीतील अग्निशमन केंद्रांना तातडीने देण्यात आली. दरम्यान, याच वेळी आगीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सुरू करून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला; पण सिडकोची यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास आल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. याबाबत सिडकोचे अधीक्षक अभियंता संजय कऱ्हाड यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
-----------------------------------------------
घरातील सामानाची राखरांगोळी
इमारतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी दरवाजा तोडून एकमेकांच्या घरातून बादलीने पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत बिलोड यांच्या घरातील बेड, टीव्ही, फ्रिज, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. ही आग स्वयंपाक घरात पोहचली असती तर मोठी हानी झाली असती. देवघरातील दिवा खाली पडून ही आग लागली असावी, असा अंदाज कळंबोली अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
---------------------------------------------------
एकाच दिवशी आगीच्या तीन घटना
खारघर, सेक्टर बारामधील एका वीजपेटीत; तर सेक्टर ३४ सीमधील ओहेल या इमारतीतदेखील एका घराला आग लागल्याची नोंद आहे; तर तळोजा वसाहतीत गणेश मंदिरालगत असलेल्या एका वीजपेटीत आगीची घटना घडली. मात्र, या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती खारघर अग्निशमन दलातील जवानांनी दिली आहे.
----------------------------------
सिडकोने गृह संकुलात उभारलेले अग्निशमन यंत्रणा बंद आहे. इमारतीमधील यंत्रणा बंद असून घरे देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे तळोजा फेज दोनमधील सर्व फायर यंत्रणेची सिडकोने पाहणी करावी; अन्यथा आंदोलन केले जाईल.
- शिवाजी पवार, रहिवासी, केदार सोसायटी
---------------------------------
आगीमुळे घरातील भाडेकरूचे स्वयंपाक घर वगळता बेड आणि हॉलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सिडकोने नुकसानभरपाई द्यावी.
- अक्षय भोर, घरमालक