
पुस्तकरुपात छत्रपती शिवरायांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : सुमारे तीन हजार २०० हून अधिक पुस्तकांच्या माध्यमातून ‘जय शिवराय’ या नावाची मांडणी करत कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना युवकांनी अनोखी मानवंदना दिली आहे. यामध्ये आणखी पुस्तकांची भर पडणार असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये देखील नोंद झाली आहे. कल्याणमधील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून ही संकल्पना राबवण्यात आली असून त्याला शालेय विद्यार्थ्यांनी मोठा हातभार लावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त कल्याण पूर्वेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिसगाव देवी मंदिरजवळील मैदानात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना युवकांनी दिली आहे. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होता येईल अशा पद्धतीने उपक्रम मंडळास राबवायचा होता. त्यातूनच मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांना पुस्तकरुपी शिवराय साकारण्याची संकल्पना सुचली. याविषयी माहिती देताना रुपेश गायकवाड म्हणाले, ‘जय शिवराय’ या नावाची पुस्तक मांडणी असलेले ४ बाय ४० फूट लांबीचे रॅक आम्ही बनवून घेतले. त्यामध्ये आपल्या जवळील एखादे पुस्तक ठेवण्याचे आवाहन नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना, तरुणांना करण्यात आले होते. दोन दिवसांत या ठिकाणी तीन हजार २०० हून अधिक पुस्तके शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जमा केली असल्याचे सांगितले.
यामध्ये आणखी पुस्तकांचा भरणा पुढील एक दिवसांत होऊ शकतो. या उपक्रमाची नोंद गिनीज तसेच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गिनीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी तीन दिवसांत आम्हाला तीन हजार पुस्तके जमा करायची होती. ते लक्ष्य आम्ही दोन दिवसांतच पूर्ण केले आहे. कल्याणकरांचा या उपक्रमास हातभार लागला असून कल्याण शहराच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड यानिमित्ताने नोंदवले जाईल, याचा आम्हाला आनंद होत आहे असे गायकवाड म्हणाले.
-------------------
किमान एक पुस्तक दान करा
शुक्रवार (ता. १७) पासून संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार आदींनी पुस्तके दान करण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसात एक हजार ४०० पुस्तके दानस्वरूपी जमा झाली आहेत. महोत्सव संपल्यानंतर गरजू शाळा, वाचनालय आणि संस्थांना पुस्तके भेट देणार असल्याने कल्याण पूर्वमधील नागरिकांनी जरूर भेट देऊन एक तरी पुस्तक दान करण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजू अंकुश तसेच नरेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.