
अंधेरीत पदपथ व्यापले लोखंडी पाईपने
जोगेश्वरी, ता. १९ (बातमीदार) ः अंधेरी पूर्वेच्या रेल्वे स्थानकाबाहेरील सहारा मार्गावरील पदपथ सध्या अडगळीत सापडला आहे. पालिकेच्या के पूर्व जल विभागाने या ठिकाणी मोठमोठे लोखंडीपाईप ठेवले आहेत. यामुळे येथून चालणे अशक्य झाले आहे. तसेच या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यावर पालिकेने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सहारा मार्ग हा सकाळ संध्याकाळ नेहमी वर्दळीचा असून येथे ठेवलेल्या पाईपमुळे येथून प्रवास करणाऱ्या बस प्रवाशांना नाहक रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतही वाढ होत आहे. अंधेरी पूर्वेत राहणाऱ्यांना रेल्वेस्टेशनचा परिसर फार महत्त्वाचा आहे. अंधेरी पूर्वेच्या आगरकर चौक आगारातून निघालेल्या या मार्गावरून बेस्ट बस व त्या पकडण्यासाठी येथे असणारे बस थांबे नेहमी नागरिकांनी गजबजलेले असतात. मात्र पदपथांवर पाईप ठेवल्यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर जाण्यासाठी अडचणी येत आहेत. काही पाईप रस्त्यावर आल्याने बेस्ट बसही अर्धेअधिक रस्त्याच्या मध्यावर उभी करावी लागत आहे. विशेष म्हणजे पालिकेचे के पूर्व कार्यालय तसेच बेस्टच्या प्रमुख आगार अंधेरी स्टेशनजवळील काही अंतरावर असून सुद्धा अशी स्थिती आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचे परिणाम मात्र प्रवाशांना व नागरिकांना भोगावे लागत आहेत; तरी संबंधित बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्याने व पालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन येथील पदपथ मोकळा करून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.