शहापुरात शिवमय वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात शिवमय वातावरण
शहापुरात शिवमय वातावरण

शहापुरात शिवमय वातावरण

sakal_logo
By

शहापूर, ता. १९ (बातमीदार) : भगवे झेंडे, फेटे आणि भगवी उपरणी यामुळे झालेले शिवमय वातावरण, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा उलगडणारे पोवाडे अशा उत्साही वातावरणात शिवरायांवर साकारलेल्या चित्ररथांसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले आबालवृद्ध अशी भव्य मिरवणूक काढून शहापुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
शहापुरात गेल्या तीन दिवसांपासून शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी भव्य बाईक रॅली, दुसऱ्या दिवशी मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा (पाळणा) आणि रविवारी (ता. १९) सकाळी दुग्धाभिषेक व शिवजयंती मिरवणूक अशा तीनदिवसीय भव्य कार्यक्रमांच्या आयोजनातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्व समावेशक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष नीलेश मांजे, कार्याध्यक्ष राजाराम डोंगरे, अनिल निचिते, जगदीश गवाळे व सचिन खिसमतराव यांच्या पुढाकाराने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळपासूनच शहापुरात भगवामय वातावरण तयार झाले होते.
शहापुरातील शिवतीर्थ, संत तुकाराम चौक (पंडित नाका), आशीर्वाद हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खालचा नाका, मिरची गल्ली, कासार आळी, ब्राह्मण आळी अशी शहापुरात मिरवणूक फिरून खाडे विद्यालय येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत अर्चना ट्रस्टच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, खाडे विद्यालय, जनकल्याण माध्यमिक विद्यालय, महिला मंडळ संचालित प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित विविध आकर्षक चित्ररथ साकारण्यात आले होते. या मिरवणुकीत सुनील शिंदे, विजय देशमुख, विवेक नार्वेकर, अरुण कासार, अजित पोतदार, जनार्दन भेरे यांच्यासह महिला भगिनीही उत्साहात सहभागी झाल्या होत्या. या वेळी पोलिस उपअधीक्षक विकास नाईक, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.