
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
नवी मुंबई (वार्ताहर): वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोपरखैरणे वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत केलेल्या कारवाईत गेल्या दीड महिन्यामध्ये ३,२४७ वाहन चालकांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे.
कोपरखैरणेमध्ये रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्याचप्रमाणे अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याबाबतच्या तक्रारी मिळाल्यानंतर कोपरखैरणे वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्यांविरोधात १ जानेवारीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. यावेळी तब्बल ३,२४७ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आला असून लाखोंचा दंड वसूल केला आहे.
---------------------------------------
या कारवाईमुळे कोपरखैरणे, घणसोली रेल्वे स्टेशन जवळील सबवे येथील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तसेच कोपरखैरणे भागातील शाळा कॉलेज तसेच महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सोडवण्यात आला आहे.
-विश्वास भिंगारदिवे, प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे