तब्बल नऊ वर्षांनी मोखाड्यात आमसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल नऊ वर्षांनी मोखाड्यात आमसभा
तब्बल नऊ वर्षांनी मोखाड्यात आमसभा

तब्बल नऊ वर्षांनी मोखाड्यात आमसभा

sakal_logo
By

मोखाडा, ता. १९ (बातमीदार) : आमसभा हा सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे हक्काचे ठिकाण आहे. मात्र २०१४ पासून म्हणजे पालघर जिल्ह्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत आमसभाच झाल्या नाहीत. यामुळे सर्वसामन्यांतून संताप व्यक्त होत होता. याशिवाय २०१९ नंतर कोरोना, राज्यातील सत्तांतर यामुळे आमसभा घेणे शक्त झाले नाही. आता आमसभेची प्रतीक्षा संपली असून मंगळवारी (ता. २१) मोखाड्यात आमदार सुनिल भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा होणार आहे. त्याबाबतचे पत्र काढून सर्व खाते प्रमुखांना सुचना केल्याचे गटविकास अधिकारी तथा आमसभा सचिव कुलदीप जाधव यांनी सांगितले आहे.
सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामकाजाशी संबधीत लोकांची कामे करताना अनेक अडचणी येते असतात. याशिवाय अनेकदा आडमुठ्या अधिकाऱ्यांमुळे मनस्तापही होत असतो. या सर्वच समस्या सगळ्यांना मांडता येत नाही. यामुळे भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फावते. यासाठी अशा सर्व विभागाच्या समस्या मांडता याव्यात, समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली वर्षाला एक आमसभा प्रत्येक तालुक्यात घ्याव्यात असा नियम आहे. या आमसभेत जनतेच्या मागणीतून विकासाचे धोरणात्मक निर्णयही घेण्यात येतात; मात्र तब्बल नऊ वर्षांत एकही आमसभा न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.

-----------------------
जनजागृती आणि सूचना
मोखाड्यातील आमसभेची सर्वांना माहिती व्हावी यासाठी मोठ्याप्रमाणावर जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे. गावातील प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यापर्यंत निरोप देणे, गावा- शहरात बॅनर लावून याची जाहिरात केली जात आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना अजेंडा दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी आमदार सुनिल भुसारा यांनी आमसभेच्या यशस्वीतेसाठी सर्व अधिकाऱ्यांना कडक सुचना दिल्या आहेत. नऊ वर्षानंतर आमसभा होत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.