जेव्हीपीडीतील रहिवासी उद्यान बचावासाठी मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेव्हीपीडीतील रहिवासी उद्यान बचावासाठी मैदानात
जेव्हीपीडीतील रहिवासी उद्यान बचावासाठी मैदानात

जेव्हीपीडीतील रहिवासी उद्यान बचावासाठी मैदानात

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : पुष्पा नरसी उद्यानात पालिका उभारणार असलेल्या भूमिगत वाहनतळाला जुहू आणि विलेपार्ले भागातील रहिवाशांनी विरोध केला आहे. रहिवाशांनी आधी व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून विरोधाची हाक दिली होती. आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत रस्त्यावर उतरत त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. अगदी छोट्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी उद्यानातील प्रस्तावित विकासकामाला विरोध केला आहे. विशेष म्हणजे, मुलांनी स्वतः रंगवलेल्या पोस्टरमध्ये ‘सेव्ह अवर पार्क’चा संदेश देत प्रकल्पाला विरोध केला.

पुष्पा पार्क पार्किंगसाठी नाही, असे संदेश देणारे अनेक फलक रहिवाशांना आंदोलनादरम्यान फडकावले. आजची नागरिकांची हजेरी प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाचा असणारा विरोध दर्शवण्यासाठी होती. प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून जेव्हीपीडी भागातील रहिवाशांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्याला विरोध केला आहे. महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातही वाहनतळ प्रकल्पाचा उल्लेख होता. त्यामुळेच नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत एक व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला होता. त्यात ४०० हून अधिक रहिवाशांनी सहभाग दर्शवला आहे. आज पुष्पा नरसी उद्यानात ६० ते ७० जणांनी हजर लावत पालिकेच्या प्रकल्पाला विरोध केला.

आज झालेल्या बैठकीमध्ये उद्यानातील झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतची चर्चा झाली. त्यासोबतच उद्यान बचावासाठी आणि वाहनतळ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गुगल फॉर्मची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यावरही एकमत झाले. स्वाक्षरी मोहिमेने प्रकल्पाच्या विरोधाला बळकटी मिळेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. पुष्पा नरसी उद्यानात येऊ घातलेल्या प्रकल्पाला विरोध करणारे पत्र पालिका आयुक्त, स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त, उद्यान अधीक्षक आणि उपायुक्तांनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच लहान मुलांनी तयार केलेले पोस्टरही पत्रासोबत जोडण्यात येणार आहेत.

स्थानिकांचा विरोध का?
पुष्पा नरसी पार्क तब्बल सात हजार चौरस मीटर जागेत विस्तारलेले आहे. त्यामध्ये सायकलिंग आणि जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठवडी शेतकरी बाजारासारखे कार्यक्रमही होतात. पालिका भूमिगत वाहनतळासाठी वृक्षतोड करण्याआधीच रहिवासी आयुक्तांना भेटण्याच्या तयारीत आहेत. उद्यानात असणारी झाडे जवळपास ६० वर्षे जुनी आहेत. उद्यानाची क्षमता वाढवण्याएवजी पालिकेने भूमिगत वाहनतळाचा प्रकल्प आणला असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

मुलांनी रंगविली पोस्टर
पुष्पा नरसी उद्यान बचावाच्या मोहिमेत अनेक रहिवासी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यासोबतच लहान मुलेही व्हॉटस्ॲपद्वारे मोहिमेत सहभागी झाली आहेत. आम्ही आमच्या उद्यानावर प्रेम करतो. आमचे उद्यान वाचवा, अशा आशयाची पोस्टर्स घेऊन तीही आंदोलनात उतरली होती.