
घोडबंदर किल्ल्यावर फडकला भगवा ध्वज
भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा जयघोषात घोडबंदर किल्ला इतिहासाला उजाळा मिळाला. या वेळी किल्ल्याच्या बुरुजावर हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला राज्यातील सर्वात मोठा १०५ फुटी भगवा ध्वज फडकवण्यात आला.
या वेळी आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्ह्याचे जिल्धाधिकारी अशोक शिनगारे, मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, पोलिस आयुक्त मधुकर पांडे आदी उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्ताने घोडबंदर गावातील दत्त मंदिरापासून ढोल-ताशाच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात ‘ध्वजपूजन’ यात्रा काढण्यात आली. स्थानिक महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन ‘कलश यात्रा’ काढली. या वेळी सगळे पारंपरिक वेशातील घोडबंदर गावातील ग्रामस्थ, दुर्ग व शिवप्रेमी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पुरोहितांकडून मंत्रोच्चारात ध्वजाची पूजा करून त्याची बुरुजावरील ध्वजस्तंभावर स्थापना करण्यात आली. हा ध्वजस्तंभ १०५ फूट उंच आहे; तर भगवा ध्वज हा २० फूट उंच व ३० फूट लांब आहे. हा ध्वज २४ तास फडकत राहणार आहे. ध्वज रात्रीही दिसावा, यासाठी आकर्षक अशी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा ध्वज उभारण्यात आला असून त्यासाठी आमदार निधीतून पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून मोकळ्या जागेत हिरवळ, किल्ल्यातील हौदात कांरजे अशी बरीच कामे अजून होणार असून त्या सुशोभीकरणाचे लोकार्पण १ मे रोजीच्या दिवशी होईल व त्याच दिवशी शिवसृष्टीचे भूमिपूजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
------------
२४ तास फडकणारा ध्वज
ध्वजस्तंभावर २४ तास फडकणारा ध्वज दर एक महिन्याने बदलण्यात येणार आहे. दर एका महिन्याने ध्वज सन्मानाने खाली उतरवून त्याजागी धुतलेला दुसरा ध्वज फडकवण्यात येणार आहे. असे एकूण सात मोठे ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.