बालनाट्याचे लेखक तयार होणे गरजेचे!

बालनाट्याचे लेखक तयार होणे गरजेचे!

कपिल प्रभू : सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १९ : नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे, करमणूक केली पाहिजे. हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा मुले नाटकाकडे वळतील. त्यासाठी आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेत. जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील, असे मत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले. बेळगाव येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय पहिल्या बालनाट्य संमेलनात ते बोलत होते.
‘बालरंगभूमी अभियाना’द्वारे आयोजित पहिल्या बालनाट्य संमेलनाचा समारोप रविवारी (ता. १९) सायंकाळी शेकडो मुलांच्या उपस्थितीत झाला. शहरातील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये आयोजित या संमेलनात विविध चार कार्यशाळांमध्ये मुंबई, बेळगाव, कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळांमध्ये बेळगाव शहरातील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 
देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी कार्यशाळेत मुद्राअभिनय, संघर्ष, कथानकाचे बीज, कथानक आणि उपकथानकाची जोडणी, खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली. ती कौशल्ये देहबोली, संवाद, विसंगती, अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली. सभोवतालची माणसे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे, आदी गोष्टींचा स्वत:च्या अभिनयकौशल्य विकसित होण्यासाठी उपयोग करावा, याबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा यांनी घेतली. या वेळी त्यांनी पालक-शिक्षक संवाद, वाचक अभिनय, भूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले.
मुंबईच्या बालरंगभूमी अभियान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी संमेलनाध्यक्ष मीना नाईक, उद्‍घाटक सई लोकूर, स्वागताध्यक्ष संध्या देशपांडे, बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर, अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव देवदत्त पाठक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
----
अभिनेत्री सई लोकूर, वीणा लोकूर यांची मुलाखत
दुपारच्या सत्रात अभिनेत्री सई लोकूर आणि तिची आई तसेच बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत कपिल प्रभू आणि विनित मासावकर यांनी घेतली. या वेळी अभिनयातील यशाचे टप्पे, सिनेसृष्टीतील आव्हानात्मक प्रवास कथन करत मुलांना नाट्यसृष्टीत येण्याचे आवाहन सई लोकूर यांनी केले; तर बालनाट्य संमेलनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबाबत वीणा लोकूर यांनी आनंद व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com