
वाशीमध्ये आणखी एका व्यक्तीची आत्महत्या
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : वाशी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची दोन दिवसांपूर्वीची घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी वाशी सेक्टर-१६ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांत नाईक (वय-३४) असे त्यांचे नाव असून आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वाशी सेक्टर-१६ मधील बी-२ वसाहतीत राहणारे प्रशांत नाईक यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच गावी गेली होती. त्यामुळे सध्या ते एकटेच राहत होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून रविवारी सायंकाळी त्यांनी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. रविवारी सायंकाळी भांडुप येथे राहणारे प्रशांतचे नातेवाईक त्याच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. मात्र, प्रशांत त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे नातेवाइकांनी रात्री ११ च्या सुमारास वाशी येथील त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर ते घरामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.