जोशी रुग्णालय खासगीकरणा विरोधात श्रमजीवीचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोशी रुग्णालय खासगीकरणा विरोधात श्रमजीवीचा एल्गार
जोशी रुग्णालय खासगीकरणा विरोधात श्रमजीवीचा एल्गार

जोशी रुग्णालय खासगीकरणा विरोधात श्रमजीवीचा एल्गार

sakal_logo
By

भाईंदर, ता.२० (बातमीदार): भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत श्रमजीवी संघटनेने सोमवारी अतिरिक्त तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भीक मांगो आंदोलन करून जमा झालेले पैसे अतिरिक्त तहसिलदारांना सुपूर्द केले. खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द झाला नाही तर आणखी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने यावेळी दिला.
जोशी रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली असल्याने त्याचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावाला श्रमजीवी संघटनेने विरोध केला आहे. भीमसेन जोशी हे शहरातील एकमेव सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात गोरगरिबांना मोफत तसेच शासकीय दरात उपचार मिळत आहेत. कोविड काळात खासगी रुग्णालयांकडून लूटमार सुरु असताना जोशी रुग्णालयात अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयाचे खासगीकरण करू नये, अशी भूमिका श्रमजीवी संघटनेने घेतली आहे.
रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी श्रमजीवी संघटनेने कार्याध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाईंदर येथील अतिरिक्त तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासाठी भीक मांगो आंदोलन केले. त्यातून जमा झालेले पैसे अतिरिक्त तहसीलदारांकडे देण्यात आले. रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधासह गरीब, मजूर, आदिवासी संबंधीच्या मूलभूत मागण्याही संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने उत्तन पाली येथे सरकारी रुग्णालय बांधावे, वन जमिनी आदिवासींच्या नावे कराव्यात, आदिवासी पाड्यांना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा द्याव्या, आदिवासींना जातीचे दाखले द्यावे, बीएसयूपी योजनेअंतर्गत गरीबांना तत्काळ घरे द्यावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाकडून अतिरिक्त तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी कमलाकर माळी, मोतीराम पवार, नागेश दुमाडा, सुलतान पटेल आदी उपस्थित होते.
...
रुग्णालय खासगीकरणाचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा अशी मागणी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर १ मार्चला श्रमजीवी संघटनेकडून मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चातही जोशी रुग्णालय खासगीकरणाचा मुद्दा प्राधान्याने घेण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध हा नागरिकांचा लढा आहे. त्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्यासाठी संघटना आणखी प्रखर आंदोलन करेल.
- स्नेहा दुबे-पंडित, कार्याध्यक्षा, श्रमजीवी संघटना

------------------------------
फोटो ओळ - भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या खासगीकरणा विरोधात श्रमजीवी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेकडून भीक मांगो आंदोलन करण्यात आले. (छायाचित्र : प्रकाश लिमये)